सुधाकर काशीद, तरुण भारत
ठराविक संघ, ठराविक खेळाडू त्यांच्यातली खुन्नस आणि शाहू स्टेडियमची ठराविक गॅलरी यामुळे कोल्हापूरच्या फुटबॉलचा (Kolhapur Football) काही जणांच्याकडून पोरखेळ केला गेला आहे. प्रत्येक स्पर्धेत गोंधळ हा ठरलेलाच आहे. पण त्यातही कालचा गोंधळ बरा होता असे म्हणायची आता वेळ आली आहे.
कोल्हापूरकरांना पेठेची अस्मिता आहे. पण अस्मिता जपता जपता खुन्नसच जास्त वाढली जात आहे. ही खुन्नस कमी करण्याचे एका बाजूला प्रयत्न होत असले तरी या खुन्नसची धग कायम ठेवणारे काही घटक सगळीकडे आहेत. फुटबॉल मधील गोंधळ कमी करायच्या संयुक्त बैठकीत त्यातलेच काही जण पुढे, आणि गोंधळात भर घालायलाही त्यातलेच पुढे असे चित्र आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी ठोस उपायाची गरज आहे.
जवळजवळ वरिष्ठ गटातले सोळा संघ. खालच्या गटातले 60-70 संघ. दरवर्षी होणाऱ्या मानाच्या आठ ते नऊ स्पर्धा. स्पर्धेत कमीत कमी 75 हजार ते जास्तीत जास्त पाच लाख 55 हजार रुपयाची पारितोषके आणि सर्व स्पर्धांना उदंड असा प्रतिसाद असताना कोल्हापूरचा फुटबॉल मात्र हुल्लडबाजीच्या विशेषणांनी ओळखला जाऊ लागला आहे. म्हटलं तर उपाय खूप सोपा आहे. तो उपाय कडू औषधासारखा आहे. पण केएसने एकदा तो उपाय करण्याची गरज आहे, आणि हा उपाय करताना के. एस एत राहूनही बाहेर कोणत्या तरी संघाची पाठराखण हा काही ठराविकांवरील आरोप पुसून काढण्याची गरज आहे. काही संघांना आपल्या उलट बाजूचा खूप अभिमान वाटतो हे चित्र खूप चिंताजनक आहे. आपल्या संघातील काही खेळाडू व विशिष्ट कोपरा धरून बसणारे आपले काही अति उत्साही समर्थक त्यामुळे कोल्हापूरचा सारा फुटबॉल बदनाम होतो याची त्यांना अजिबात फिकीर नाही, आणि अशी हुल्लडबाजी केली तर पुढे काय होईल याची त्यांना भीतीच वाटत नाही.
कोल्हापूरच्या फुटबॉल चा इतिहास, तिथले खेळाडू, ते कसे घडले? कोणत्याही सुविधा नसताना खेळाडूंनी केवळ आपल्या जिद्दीवर खेळ कसा जपला? खेळ कसा पुढे नेला हा स्वतंत्र विषय आहे. पण त्या इतिहासाची नवे खेळाडू काही संघ त्यांचे पाठीराखे यांना खूप कमी जाण आहे. फुटबॉल मध्ये इर्षा पाहिजेच. ईर्षा नसेल तर फुटबॉलला मारलेली कीक आणि हवेत मारलेली किक यात फारसा फरकच नसणार आहे. कोल्हापुरातला फुटबॉल या इर्षेवरच नक्की वाढला मैदानावर त्या त्या क्षणाला थोडा वाद होत राहिला. पण मॅच संपली की तो वाद मैदानातच विसरून एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून खेळाडूंचा जथा मैदानाबाहेर पडत राहिला. पण आता या ईर्षेला खुन्नस जोडली गेली आहे. ही खुन्नस शिवीगाळ, विचित्र अंग विक्षेप यावरून डोकी फोडण्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. इतकी विचित्र खुन्नस आहे की या हुल्लडबाजीत कधीतरी कोणाचा तरी जीव जाण्याचा धोका आहे.
अर्थात या हुल्लडबाजीच्या घटनांचा पंचनामा केला तर ठराविक संघ ठराविक खेळाडू व ठराविक गॅलरी यातच या हुल्लडबाजीचे मूळ स्पष्ट आहे. पोलिसांच्याकडे या हुल्लडबाजीची कुंडलीच आहे. पण मैदानावर कारवाई करताना पोलीसही डावा उजवा करतात असा एक आरोप कित्येक वर्षापासून आहे. मात्र यातूनही एक आशादायक चित्र असे आहे की या हुल्लड बाजीची लागण सर्वच संघांना, त्यांच्या समर्थकांना लागलेली नाही. त्यामुळे काही हाय व्होल्टेज संघ, हाय टेम्पर असलेले खेळाडू व हाय खुन्नस जपणारे समर्थक यांना मनात आणलं तर रोखणे शक्य आहे. कोणाच्या मतावर त्याचा काय परिणाम होईल असला विचार जर अशा कारवाईच्या वेळी केला गेला तर तो कोल्हापूरच्या फुटबॉलची दिशा तिसरीकडेच नेणारा असणार आहे.
त्यामुळे या परिस्थितीत कोल्हापूर म्हणून खरोखर फुटबॉल जपला जावा असे वाटणारे कार्यकर्ते कोण? आत एक भूमिका व बाहेर एक भूमिका घेणारे कार्यकर्ते कोण? मी म्हणजेच कोल्हापूरचा फुटबॉल असली हवा डोक्यात घेतलेले खेळाडू व त्यांचा संघ कोण? ही वर्गवारी बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे. त्यावर आताच विचार होणे काळाची गरज आहे, नाहीतर कोल्हापूरचा फुटबॉल आणि हुल्लडबाजी हेच समीकरण अधिक घट्ट होणार आहे.
विदेशी खेळाडूंनी घेतली संधी..
कोल्हापूरच्या या इर्षा आणि खुन्नसपणाची नशा काही परदेशी खेळाडूंनी शंभर टक्के ओळखली. मध्यंतरी कोल्हापुरात घराघरात फुटबॉलचे खेळाडू असताना विदेशी खेळाडू घेण्याची क्रेझच आली. विदेशी खेळाडूंनीही कोल्हापूरच्या संघांची “अस्मिता” ओळखून आपल्याला हवे तेवढे मानधन मिळवून घेतले. त्याचवेळी स्थानिक खेळाडू मात्र अगदी अल्पशा सोयी सुविधावर त्याच संघाकडून खेळत होते.