विशाखापट्टणम | भारताच्या युवा संघाने ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या पहिल्याच टी-20 मॅचमध्ये दणदणीत विजय मिळवत वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदल घेतला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज 80 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर दोन विकेट्स राखत थरारक विजय मिळवला. या विजयासह भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Bharat Vs Australia T20 – 2023 – भारताच्या डावाची आक्रमक सुरुवात यशस्वी जैस्वालने केली. पण यावेळी दुहेरी धाव घेण्याच्या नादात यशस्वी आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात ताळमेळ जमला नाही. दुसरी धाव घेण्यासाठी यशस्वी धावत सुटला पण त्यानंतर तो पीचच्या मध्येच थांबला आणि त्याने आपण धाव घेणार नसल्याचे संकेत ऋतुराजला दिले. ऋतुराज तेव्हा क्रीझ सोडून अर्ध्या पीचवर आला होता आणि तिथून माघारी फिरणे त्याला शक्य नव्हते. त्यामुळे एकही चेंडू न खेळता ऋतुराज बाद झाला.
ऋतुराज बाद झाल्यानंतर यशस्वी याची भरपाई करेल, असे वाटत होते. पण तो जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. मॅथ्यू शॉर्टला ऑफ साईटला मोठा फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. यशस्वीने यावेळी 8 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 21 धावा केल्या. यशस्वी बाद झाल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. त्यानंतर सूर्या आणि इशान किशन यांची चांगली जोडी जमली होती. ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारून देईल, असे वाटत होते. या दोघांनीही अर्धशतकं झळकावली. पण इशान किशन 2 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 56 धावांवर बाद झाला.
ऑस्ट्रेलियाचा डाव
टॉस गमावून फलंदाजीस आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुुरुवात चांगली झाली नाही. त्यांचा सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट लवकर बाद झाला. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिशने शानदार शतक झळकावले. त्याने 50 चेंडूत 110 धावा केल्या. या काळात त्याने 11 चौकार आणि 8 षटकार मारले. इंग्लिशने 220 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.
इंग्लिसने स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारीही केली. स्मिथने 52 धावांची खेळी खेळली. टीम डेव्हिडने नाबाद 19 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट 13 धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिसने नाबाद 7 धावा केल्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.