मुंबई | उपनगरीय रेल्वे मार्गावर सुरक्षा देण्याची जबाबदारी असलेल्या मुंबई लोहमार्ग पोलिसांची हद्द आता सिधुदुर्गपर्यंत वाढली आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे उपनगरीय रेल्वे मार्गावर चार एलटीटी, अंबरनाथ, आसनगाव, भाईंदर आणि कोकणात रोहा, रत्नागिरी, कणकवली येथे तीन नविन लोहमार्ग पोलीस ठाण्याची स्थापना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गृहविभागात मंगळवारी झालेल्या बैठकीत नबिन लोहमार्ग पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली. याकरिता अतिरिक्त ८७८ पोलिसांची पदे भरण्यात येणार आहेत.
Mumbai Railway Police Bharti 2024
मध्य रेल्वे मार्गावरुन दररोज ३५ लाख तर पश्चिम रेल्वेवरुन २५ ते २८ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची संख्या आणि १७ लोहमार्ग पोलीस ठाण्याचा विचार करता लोहमार्ग पोलिसांची संख्या अपुरी आहे. प्रस्तावानुसार सध्या कोकण रेल्वेच्या सुरक्षिततेची जबाबदारी मुंबई रेल्वे पोलिसांकडे सोपवली असून त्यासाठी कोकणात तीन नवी रेल्वे पोलीस ठाणी स्थापन करण्यात येणार आहे. ४४७ किलोमीटरच्या या अतिरिक्त मार्गाच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वे पोलीस उपायुक्त हे पद निर्माण करण्यात येणार आहे. कल्याणनंतर थेट कसारा रेल्वे पोलीस स्टेशन आहे. या दोन रेल्वे पोलीस स्टेशनमधील अंतर ६७ किलोमीटर असून त्यादरम्यान सुमारे १२ स्थानकांचा समावेश आहे.
दुसरीकडे कर्जत मार्गावर कल्याणनंतर थेट कर्जत रेल्वे पोलीस ठाणे आहे. त्या दोन स्थानकांमधील अंतर सुमारे ४६ किलोमीटर आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण जंक्शनवर सर्व मेल- एक्स्प्रेस आणि लोकल थांबतात, शहाड, आंबिवली, टिटवाळा, वाशिद, आसनगाव, खडर्डी येथे मोठया संख्येने गृह संकुले आहेत. परिणामी येथून रोज मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.
शहाड ते खर्डीदरम्यान काही घटना घडल्यास तक्रारदारांना कल्याण रेल्वे पोलीस गाठावे लागायचे. एलटीटीतून दररोज सुमारे दीड लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करतात. एलटीटी स्थानक कुर्ला रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येते, पण कुर्ला रेल्वे पोलिसांची हद्द व वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता एलटीटीमध्येही स्वतंत्र रेल्वे पोलीस ठाणे आवश्यक आहे. याअंतर्गत गोवंडी, मानखुर्द आणि हार्बर मार्गावरील वडाळा ते गोरेगाव स्थानकांचा समावेश होईल.