मुंबई | मृद व जलसंधारण विभागांतर्गत 670 रिक्त पदांची सरळसेवा भरती (Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2023) प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट- ब (अराजपत्रित) या संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
शासन अधिसूचना दि. 21 सप्टेंबर 2021 नुसार जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट- ब (अराजपत्रित) या पदांचे सेवाप्रवेश नियम अधिसूचित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद हे या भरती प्रक्रियेचे नियुक्ती प्राधिकारी आहेत. या अनुषंगाने आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे. या पद भरतीकरीता टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस या कंपनीसोबत करारनामा करण्यात आला आहे.
या परीक्षेसाठी अभ्यासक्रमास तत्काळ मान्यता देऊन परीक्षेसाठी वेळ निश्चित करण्यात येत आहे. त्यानुसार पद भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. यासाठी एकूण 200 गुणांची परीक्षा असून यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी (पदविकास्तर), मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमापन चाचणी या विषयांचा अंतर्भाव असणार आहे.