अंतरवलीत संभाजी राजे थेट मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला; आमरण उपोषणापूर्वी घेणार भेट! Manoj Jarange Patil

Share Me

जालना | मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची डेडलाईन काल संपली आहे. काल दिवसभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाची घोषणा केली नाही. उलट छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र आरक्षण कधीपर्यंत देणार याबाबत काहीच स्पष्टता दिली नाही.

मुख्यमंत्री दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात मराठा आरक्षणा संदर्भात ठोस भूमिका जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या भाषणातील वक्तव्यानंतर मराठा समाजाच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न अंधांतरीच लटकण्याची चिन्हे आहेत. असे असले तरी मनोज जरांगे पाटील मात्र आमरण उपोषणावर ठाम आहेत. आजपासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषण करणार आहेत. त्यामुळे या उपोषणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज अंतरवली सराटीत उपोषणाला बसणार आहेत. त्यांचे हे आमरण उपोषण असणार आहे. उपोषणा दरम्यान अन्नपाणी आणि औषधेही घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच येत्या 28 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा सांगणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणापूर्वीच छत्रपती संभाजीराजे (Yuvraj Sambhaji Chhatrapati) त्यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी 12.30 वाजता संभाजीराजे आणि जरांगे पाटील यांची भेट होणार आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची खलबते होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागच्या उपोषणावेळी देखील त्यांना भेटायला जाणारे संभाजीराजे हे पहिले नेते होते. सर्वात आधी संभाजीराजे यांनी अंतरवलीत जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता. आज पुन्हा एकदा जरांगे पाटील उपोषणाला बसत आहेत. त्यामुळे संभाजीराजे त्यांची भेट घेणार असून यावेळीही जरांगे यांना भेटणारे संभाजीराजे हे पहिलेच नेते असणार आहेत.


Share Me