News

Manohar Joshi Passed Away: राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे (२३ फेब्रुवारी) तीनच्या सुमारास निधन झाले, ते ८६ वर्षाचे होते. गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ICUमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. सुरुवातीला माधूकरी, त्यानंतर मुंबईत येऊन शिकवणी वर्ग, ‘कोहिनूर’ची स्थापना, १९७६ ला मुंबईचे महापौर, मार्च १९९० ते डिसेंबर ९१ विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर ९९ ते मे २००२ केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

मनोहर जोशींची राजकीय कारकीर्द (Manohar Joshi Passed Away)

प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही काळापासून मनोहर जोशी राजकारणात सक्रिय नव्हते. त्यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केले आहे. 

त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षणाच्या निमित्तानं मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली, त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं. 1995 साली राज्यात ज्यावेळी युतीची सत्ता आली त्यावेळी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मुख्यमंत्री असतांना जावयाला भूखंडाचा लाभ मिळवून देण्याचा कथित आरोप त्यांच्यावर झाले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना चिठ्ठी पाठवत राजीनामा देण्यास सांगितले. तेव्हा तात्काळ आदेश मानत जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

ऑक्टोबर २०१३ च्या शिवाजी पार्क इथे झालेल्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. नोव्हेंबर २०१२ ला बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मारकाचा विषयावरून केलेल्या टिप्पणीमुळे मनोहर जोशी यांना शिवसैनिकांनी लक्ष्य केले होते. शुक्रवारी दुपार नंतर दादर स्मशान भूमीत जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Back to top button