Maharashtra Police Bharti 2024

राज्यात 17,471 पदांची पोलीस भरती | Maharashtra Police Bharti 2024

मुंबई | महाराष्ट्रात तब्बल 17,471 पोलीसांची भरती केली जाणार आहे. राज्याच्या वित्त विभागाकडून पोलिसांच्या भरती प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे पोलीस दलातील मेगा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भातील शासन आदेश गृह विभागाने बुधवारी जारी केला.

नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मुंबईत ३ हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार होती. राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांमधून कंत्राटी भरती करण्याचा गृहखात्याचा विचार होता. परंतु आता प्रकाशित नवीन अपडेट नुसार गृहखात्याने थेट पोलीस भरतीला मान्यता दिली आहे. 

सुरक्षा मंडळाच्या जवानांना पोलिसांसारखे प्रशिक्षण देऊन कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यांसाठी भरती केली जाणार होती. या कंत्राटी पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची टंचाई असल्याने नवीन भरती होईपर्यंत गृह खात्याने हा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले होते.

सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका करत कंत्राटी ऐवजी पोलीस भरती करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेत, नव्याने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला. वित्त विभागाकडून 100 टक्के पोलीस भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 17,471 पोलिसांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलीस शिपाई, बॅण्डस्मैन पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी पदे यातून भरली जाणार आहेत.


मुंबई पोलीस दलात 12,899 पदे रिक्त | Maharashtra Police Bharti 2024

मुंबई | पोलिस दलात मनुष्यबळाचा तुटवडा भासत असल्याचे समोर आले आहे. सध्या अपर पोलिस आयुक्तपदापासून शिपाईपदापर्यंत १२ हजार ८९९ पदे रिक्त असल्याची माहिती उघड झाली आहे. RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करून मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती विचारली होती.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिस दलात एकूण मंजूर पदांची संख्या ५१,३०८ आहेत. यात ३८,४०९ कार्यरत पदे असून १२,८९९ पदे रिक्त आहेत. पोलिस शिपायाची २८,९३८ पदे मंजूर आहेत. यापैकी १७,८२३ कार्यरत पदे असून ११,११५ पदे रिक्त आहेत. यानंतर पोलिस उपनिरीक्षकाची ३,५४३ पदे मंजूर असताना फक्त २,३१८ कार्यरत पदे असून १,२२५ पदे रिक्त आहेत. पोलिस निरीक्षकाची १,०९० मंजूर पदे असून यापैकी ३१३ पदे रिक्त आहेत.

सध्या ९७७ कार्यरत पदे आहेत. सहायक पोलिस आयुक्ताची १४१ पैकी २९ पदे रिक्त आहेत. पोलिस उपायुक्ताची ४३ पदे मंजूर असून ३९ पदे कार्यरत आहेत. यात ४ पदे रिक्त आहेत; तर अप्पर पोलिस आयुक्तपदाचे १२ पैकी फक्त १ पदे रिक्त आहेत. मंजूर पदे ही पूर्वीपासून असून यात काही बदल झाला नाही. पण, प्रत्येक वर्षी सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यात काळानुसार बदल करत रिक्त पदे भरताना मंजूर पदांची संख्या वाढवली, तर मुंबई पोलिसांवर येत असलेला ताण कमी होईल, असे गलगली यांनी नमूद केले.


खुशखबर! 13हजार पदांची नवीन पोलीस भरती, शासन स्तरावर प्रक्रिया सुरु | Maharashtra Police Bharti 2024

मुंबई | राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून यावर्षी 13 हजार पदांची नवीन पोलिस भरती केली जाणार आहे. त्यादृष्टीने गृह विभागाने नियोजन सुरू केले असून राज्यातील 10 केंद्रांमधील नवप्रविष्ठांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपेल. तत्पूर्वी, लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर पोलिस भरतीची घोषणा होवू शकते अशी माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे.

राज्याची लोकसंख्या वाढली, पण पोलिस ठाणी आणि पोलिसांचे मनुष्यबळ तवढेच असल्याची स्थिती आहे. गेल्या 70 वर्षांपूर्वीच्या आकृतीबंधानुसारच सध्या मनुष्यबळ आहे. राज्यातील सद्य:स्थिती आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्यांची गरज ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन किती पोलिस भरतीची गरज आहे याचा अंदाज घेतला जात आहे.

Maharashtra Police Bharti 2024

प्रत्येक शहर- जिल्ह्याकडून वाढीव पोलिस ठाणी आणि मनुष्यबळाच्या मागणीचे प्रस्ताव मागवून घेतले जात आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सतेज पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाचा 1976चा आकृतीबंध नव्याने तयार केल्याचे सांगितले होते. गृह विभागाने 23 हजार पोलिसांची भरती केली आहे, तरी देखील पोलिस खात्याला मनुष्यबळ कमीच पडत आहे. त्यामुळे आता नवीन आकृतीबंधानुसार गृह विभागाकडून भरती केली जाणार आहे.

राज्याच्या पोलिस दलात दोन लाख कॉन्स्टेबल आहेत. त्यात दरवर्षी अडीच ते तीन टक्के पोलिस सेवानिवृत्त होतात. एक हजारापर्यंत पोलिसांचे प्रमोशन होते आणि काहीजण स्वेच्छानिवृत्ती घेतात तर काहींचा अपघाती किंवा आजारपणामुळे मृत्यू होतो. अशा कारणांमुळे दरवर्षी जवळपास सहा हजार पोलिसांची पदे रिक्त होतात अशी माहिती खास पथके व विशेष प्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आली. दोन वर्षाची मिळून अंदाजे 13 हजार पदे रिक्त असतील. नुकत्याच भरती झालेल्या नवप्रविष्ठांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपणार आहे. तत्पूर्वी, नवीन पोलिस भरतीची घोषणा होवू शकते. त्याचवेळी वयोमर्यादेच्या उंबरठ्यावरील तरूण- तरूणींना भरतीत संधी मिळू शकते, असेही सांगितले जात आहे.

नवीन पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव मागविले

जिल्ह्यातील ग्रामीण किंवा शहरी भागाचा वाढलेला विस्तार, लोकसंख्येतील वाढ, गुन्हेगारीचे प्रमाण या प्रमुख बाबींचा विचार करून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (पोलिस अधीक्षक किंवा पोलिस आयुक्त) वाढीव पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव गृह विभागाकडून मागविले जात आहेत. त्यानुसार संबंधित जिल्ह्यांची गरज पाहून नवीन आकृतीबंधानुसार मनुष्यबळ व पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली जाणार आहे.

Scroll to Top