Ginger Price Update News : आले दरात तीन-चार हजार रुपयांची वाढ, शेतकरी वर्गाला दिलासा

सातारा | मागील आठ-दहा दिवसांपासून आल्याच्या दरात सुधारणा (Ginger Price Update News) होत असल्याचे दिसत असून, या बदलामुळे चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळाला आहे. सध्या प्रति गाडी (५०० किलो) आल्याला १० ते ११ हजार रुपयांचा दर मिळू लागला आहे, जो मागील महिन्याच्या तुलनेत तब्बल तीन ते चार हजारांनी वाढला आहे.
मार्च महिन्यात दर चांगले असले तरी एप्रिलपासून सतत घसरण होत गेली. काही काळातच सहा-सात हजार रुपयांवर आले दर पोहोचले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नफा कमी असतानाही आले काढून विक्री केली. व्यापाऱ्यांकडूनही खरेदीचा वेग कमी झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल पडून राहू नये म्हणून मजूर लावून धुतलेले आले थेट बाजारात पाठवल्याचेही पहायला मिळत होते.
सलग तीन महिने दर घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र आता पुन्हा एकदा बाजारात काही प्रमाणात तेजी दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या पावसामुळे पीक काढता येत नसल्याने बाजारात आले आवक कमी झाली आहे आणि त्यामुळेच दर वाढले आहेत.
मालाच्या खरेदी-विक्री व्यवहारांबाबत अजूनही काही शेतकरी साशंक असल्याचं चित्र आहे. त्यामुळे काही व्यवहार गोपनीय पद्धतीने होत असल्याची माहिती आहे. तरीही, दरात झालेली ही वाढ शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत असून, पुढील काही दिवसांत बाजारभाव कसे राहतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.