सेल्फीचा नाद, एकदम बाद..! राऊतवाडी धबधब्यात तरूण गेला वाहून अन् पर्यटक आले धावून | Rautwadi Waterfall

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम घाटातील धबधबे पुन्हा एकदा प्रवाही झाले आहेत. त्यामुळे पावसाठी निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्याासाठी पर्यटकांनी धबधब्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. परंतु निसर्ग सौंदर्य पाहण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे.
राधानगरी तालुक्यातील प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा (Rautwadi Waterfall) प्रवाहित झाल्यानंतर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र, काल (शनिवार) येथे एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने धबधब्याच्या खालच्या भागात सेल्फी घेण्यासाठी पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. पण पाय घसरल्याने तो थेट पाण्याच्या जोरदार प्रवाहात पडला आणि वाहून जाऊ लागला.
दरम्यान, प्रसंगावधान राखत इतर पर्यटकांनी तात्काळ मदतीसाठी पुढे येत त्याचा जीव वाचवला. कोणतेही बचाव साहित्य नसताना मोठ्या धाडसाने त्या तरुणाला पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. या घटनेत त्या तरुणाचा मोबाईल मात्र पाण्यात वाहून गेला असला तरी त्याचा जीव वाचला आहे.
पर्यटन करा पण काळजीपूर्वक!
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील धबधब्यांवर पर्यटकांचा ओघ असतो. यावर्षीही गगनबावडा, शाहूवाडी, आजरा, राधानगरी परिसरात जोरदार पावसामुळे राऊतवाडीसह इतर धबधबे प्रवाहित झाले आहेत. मात्र या सौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षिततेच्या उपायांची कमतरता आणि अतिउत्साहीपणा यामुळे अपघात घडत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील पावसाळी परिस्थिती : नद्या आणि धरणांची पाणी पातळी वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, राधानगरी यासह धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे राधानगरी धरणात आजअखेर 61 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पॉवर हाऊसमधून 3100 क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. परिणामी पंचगंगेची पाणी पातळी 27 फुटांवर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सर्वाधिक पाऊस गगनबावड्यात 643 मिमी, शाहूवाडीत 336.7 मिमी, आजऱ्यात 309.8 मिमी आणि राधानगरी तालुक्यात 279.7 मिमी नोंदवला गेला आहे.