Russia Earthquake: रशियात 8.8 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; रशिया, जपान किनाऱ्यावर त्सुनामी
मॉस्को : रशियाच्या कामचटका भागात 8.8 रिश्टर स्केलचा महाभयंकर भूकंप झाला असून, त्यानंतर रशिया आणि जपानच्या किनारपट्टीवर त्सुनामीच्या लाटा आदळल्या. हा भूकंप दशकातील सर्वात तीव्र असून, अमेरिकेनं तो सहावा सर्वात मोठा भूकंप असल्याचं जाहीर केलं आहे. अमेरिकेतही सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Russia Earthquake: रशियाच्या कामचटका भागात बुधवारी सकाळी ८.२५ वाजता (स्थानिक वेळेनुसार) ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. हा भूकंप इतका जोरदार होता की त्यानंतर त्सुनामीच्या तब्बल १३ फूट उंच लाटा किनाऱ्यावर आदळल्या. या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर जपान, अमेरिका (हवायसह) या देशांमध्येही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्रबिंदू जमिनीपासून १९.३ किमी खोल होते. भूकंपामुळे रशियातील काही भागांत मोठ्या प्रमाणावर इमारतींना तडे गेले, तर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे समोर आले आहे, मात्र काही नागरिक किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.
कामचटका भागातील या भूकंपामुळे प्रशांत महासागराच्या किनाऱ्यालगत असलेल्या जपानमधील होक्काइडो बेटावर सुमारे ३० सेंटीमीटर उंचीची त्सुनामी लाट आली. याशिवाय, ओसाका जवळील वाकायामा भागापर्यंत तीन मीटर उंच लाटा पोहोचू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवायमधील हॉनोलूलूमध्ये त्सुनामीचा धोका लक्षात घेता सायरन वाजवण्यात आले. काही भागांत वाहतूक कोंडी झाली असून, डोंगराळ मार्ग खुले करण्यात आले आहेत. ओहू बेटावरील किनाऱ्यालगतच्या वायनाई भागात रहिवाशांचे स्थलांतर सुरू आहे.
रशियाचे आपत्कालीन परिस्थिती मंत्री सर्गेई लेबेदेव यांनी नागरिकांना किनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तर, रशियाच्या गव्हर्नर व्लादिमीर सोलोदोव यांनी हा भूकंप गेल्या काही दशकांतील सर्वात शक्तिशाली असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, या भूकंपानंतर एक चर्चा पुन्हा जोर धरत आहे – ती म्हणजे जपानमधील भविष्यवक्ता म्हणून ओळखले जाणारे रिओ तात्सुकी यांच्या भाकितांची. त्यांनी 1999 साली प्रसिद्ध केलेल्या मांगा पुस्तकात, 5 जुलै 2025 रोजी जपान आणि फिलिपिन्स दरम्यान समुद्रात मोठे नैसर्गिक संकट येईल, अशी भविष्यवाणी केली होती. या पुस्तकात हे संकट 2011 च्या तोहोकू आपत्तीपेक्षा अधिक भयंकर असेल, असेही म्हटले होते. काही मीडिया अहवालांनुसार, त्यांच्या या भाकितांकडे लोक नव्याने पाहू लागले आहेत.
भूकंपाशी संबंधित घटनांचा व्हिडिओही समोर आला असून, त्यात जमिनीचा थरकाप उडाल्याचे स्पष्ट दिसते. सध्या प्रशासनाने कामचटका भागात आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत.
(टीप: वरील माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. यात दिलेल्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आमचा उद्देश अंधश्रद्धा पसरवणे नाही.)