‘महादेवी’ परत येणार… शेवटी वनतारा झुकलं, कोल्हापूरकरांची माफीही मागितली! Mahadevi Elephant

कोल्हापूर | नांदणी मठ आणि कोल्हापूरकरांच्या श्रद्धेचा भाग असलेली माधुरी उर्फ महादेवी हत्तीण (Mahadevi Elephant) परत मिळावी, यासाठी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात जनआंदोलन होत आहे. यासंदर्भात आज एक मोठी घडामोड समोर आली आहे. वनताराचे सीईओ विहान करानी यांनी मठाचे महास्वामी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
ही बैठक कोल्हापूरमधील जैन बोर्डिंगमध्ये पार पडली. यावेळी वनताराचे सीईओ विहान करानी, नांदणी मठाचे भट्टारक पट्टाचार्य जीनसेन महाराज, माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार राहुल आवाडे यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत महत्त्वपूर्ण घोषणा केली.
करानी यांनी सांगितले की, नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकार मिळून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. या याचिकेद्वारे हत्तीच्या पुनर्वसनाची आणि देखभाल व्यवस्थेची स्पष्ट रूपरेषा मांडली जाणार आहे. विशेष म्हणजे, वनतारामध्ये जशी हत्तींसाठी व्यवस्था आहे, तशीच व्यवस्था मठात उभी केली जाणार आहे.
करानी पुढे म्हणाले, “हत्तीच्या या प्रकरणात कोणाचीही हार किंवा विजय नाही. इथे हत्तीचा विजय आहे. कारण तिला दोन्हीकडे – वनतारामध्ये आणि मठातही – चांगले घर मिळाले असते. आम्ही कधीही कोल्हापूरकरांना दुखावण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांची भावना समजून घेऊन काम करत आहोत. तुमची माधुरी लवकरच कोल्हापुरात परतेल.”
याचिकेसाठी PETA आणि HPC या संस्थांचा देखील पाठिंबा असणार आहे. करानी यांनी स्पष्ट केले की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच ते पावले उचलत आहेत आणि संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि समंजसपणा ठेवला जात आहे.
दुसरीकडे नांदणी मठाच्या महास्वामींनी देखील सकारात्मक भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, “वनताराच्या टीमबरोबर समाधानकारक चर्चा झाली आहे. हत्तीची मालकी मठाकडे राहणार असून वैद्यकीय आणि देखभाल व्यवस्था वनतारा पाहणार आहे. माधुरी परत येईपर्यंत वनताराने सहकार्य करावे, ही आमची विनंती आहे.” त्यांनी अनंत अंबांनी यांच्या भूमिकेचे स्वागत करत त्यांना आशीर्वाद दिला.