भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठी माहिती समोर; जर हा सामना नाही झाला तर फायदा कुणाला? Asia Cup 2025 IND vs PAK
भारताने सामना न खेळल्यास पाकिस्तानला वॉकओव्हर मिळेल आणि ते पुढच्या फेरीत पोहोचतील. त्यामुळे बीसीसीआय या सामन्यातून माघार घेऊ शकणार नाही.

Asia Cup 2025 IND vs PAK | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत कोणताही सामना खेळू नये, अशी मागणी अनेक राजकीय नेत्यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा क्रिकेट मैदानात आमनेसामने येणार असल्याने वाद निर्माण झाला आहे. आशिया कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं असून 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान युएईत ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना भारत-पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबरला रंगणार आहे.
ओवैसींचा थेट सवाल
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या सामन्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं. “बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्ल्यानंतरही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना कसा होऊ शकतो?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
सामना रद्द झाल्यास पाकिस्तानला फायदाच!
मिळालेल्या माहितीनुसार, हा सामना रद्द झाल्यास त्याचा थेट फायदा पाकिस्तानला होणार आहे. कारण ही द्विपक्षीय मालिका नसून बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे. भारताने सामना न खेळल्यास पाकिस्तानला वॉकओव्हर मिळेल आणि ते पुढच्या फेरीत पोहोचतील. त्यामुळे बीसीसीआय या सामन्यातून माघार घेऊ शकणार नाही, असंही बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
ACC ची मान्यता, BCCI अडचणीत
या सामन्याला आशियाई क्रिकेट परिषद (ACC) कडून परवानगी मिळाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. ACC अध्यक्षपद सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मोहसिन नक्वी यांच्याकडे आहे. त्यामुळे भारतातील विरोध असूनही सामना रद्द करणे शक्य नाही.
प्रसारण हक्क आणि आर्थिक गणित
ही स्पर्धा ICC नव्हे, तर ACC आयोजित करत आहे. या स्पर्धेचे प्रसारण हक्क सोनी नेटवर्ककडे असून त्यासाठी 17 कोटी डॉलर्स (सुमारे 1475 कोटी रुपये) चा करार आहे. भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यास त्याचा मोठा आर्थिक फटका प्रसारकांसह इतर ACC सदस्य देशांनाही बसणार आहे.
आशिया कप 2025 – वेळापत्रकावर एक नजर
- 9 सप्टेंबर : स्पर्धेला सुरुवात
- 10 सप्टेंबर : भारत विरुद्ध युएई
- 14 सप्टेंबर : भारत विरुद्ध पाकिस्तान
- 19 सप्टेंबर : भारत विरुद्ध ओमान
यानंतर सुपर सिक्स आणि नंतर उपांत्य व अंतिम फेरीचे सामने होतील. भारत आणि पाकिस्तान या फेऱ्यांमध्येही पुन्हा आमनेसामने येऊ शकतात.