‘पुणे तिथे काय उणे’, पुण्यातील शास्त्रज्ञांनी शोधला LPG ला पर्याय DME; हे कृत्रिम इंधन नेमकं काय आहे? जाणून घ्या | DME can replace LPG
A major step towards energy self-reliance with clean fuel innovation.

युद्धपरिस्थितीचा परिणाम भारतापर्यंत पोहोचला तो एलपीजीच्या उपलब्धतेवर झालेल्या ताणामुळे. अनेक शहरांमध्ये मेस बंद पडल्या, रेस्टॉरंटचे मेन्यू बदलले आणि चहा-कॉफीसारख्या मूलभूत गोष्टींची उपलब्धता कमी झाली. या पार्श्वभूमीवर भारताचे एलपीजीवरील परावलंबित्व प्रकर्षाने समोर आले. याच समस्येवर उपाय म्हणून पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी (NCL) येथील शास्त्रज्ञांनी ‘डाय मिथाईल इथर’ (DME) या कृत्रिम इंधनाचा पर्याय विकसित केला आहे.
गेल्या 20 वर्षांपासून चाललेल्या संशोधनातून हे इंधन तयार करण्यात आले आहे. एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले आणि डॉ. थिरूमलैस्वामी राजा यांच्या नेतृत्वाखालील संशोधनातून हा महत्त्वपूर्ण शोध लागला आहे. एलपीजीला पर्याय ठरू शकणाऱ्या या इंधनाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.
डाय मिथाईल इथर (DME) हे रासायनिक प्रक्रियेतून तयार होणारे कृत्रिम इंधन आहे. याच्या निर्मितीसाठी ‘उत्प्रेरक’ (कॅटलिस्ट) महत्त्वाची भूमिका बजावतो. भारतात उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करून चार वेगवेगळ्या प्रकारचे उत्प्रेरक विकसित करण्यात आले आणि त्यातून अंतिम प्रभावी उत्प्रेरक तयार करण्यात यश आले.
डॉ. थिरूमलैस्वामी राजा यांनी सांगितले की, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा दोन्ही पद्धतींनी DME तयार करण्याचे प्रयत्न करण्यात आले. या प्रक्रियेसाठी योग्य उत्प्रेरक तयार करणे हे मोठे आव्हान होते, जे आता यशस्वीरीत्या पार पाडले गेले आहे.
डॉ. आशिष लेले यांच्या मते, या प्रक्रियेत मिथेनॉलच्या दोन अणूंना एकत्र करून त्यातून पाण्याचा अणू वेगळा केला जातो आणि उरते ते डाय मिथाईल इथर. ही प्रक्रिया ऐकायला सोपी असली तरी प्रत्यक्षात अत्यंत गुंतागुंतीची आहे. प्रयोगशाळेतील यश मोठ्या प्रमाणावर उत्पादनातही टिकते का, यासाठी विविध स्तरांवर प्रयोग करण्यात आले.
सध्या तयार केलेले DME अत्यंत स्वच्छ जळणारे इंधन आहे. गॅस पेटवला असता त्याची ज्वाळा जवळजवळ दिसत नाही. धूर, नायट्रोजन ऑक्साईड्स (NOx), सल्फर ऑक्साईड्स (SOx) आणि सूक्ष्म कणांचे उत्सर्जन अत्यंत कमी होते. पारंपरिक इंधनांइतकीच उष्मीय कार्यक्षमता असल्याने हे इंधन प्रभावी पर्याय ठरते.
घरगुती वापराच्या दृष्टीनेही DME फायदेशीर आहे. एलपीजीप्रमाणे कार्बन जमा होत नाही, त्यामुळे शेगडी स्वच्छ ठेवण्याची गरज कमी होते. हे इंधन पूर्णपणे स्वदेशी असून त्यासाठी लागणारे सर्व घटक भारतातच उपलब्ध आहेत, त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होऊ शकते.
एनसीएलने विकसित केलेल्या तंत्रज्ञानात उत्प्रेरकासोबतच विशेष रिअॅक्टरचीही निर्मिती करण्यात आली आहे. सध्या 12 ते 13 किलो DME उत्पादन क्षमता असलेला प्रोटोटाईप तयार आहे आणि दिवसाला 250 किलो उत्पादनक्षम प्रकल्प उभारला जात आहे.
या तंत्रज्ञानाची चाचणी बेंगळुरू येथील LPG Equipment Research Centre (LERC) मध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हे इंधन केवळ 10 बार दाबावर तयार करता येते आणि थेट एलपीजी सिलिंडरमध्ये भरता येते. DME 7 बार दाबावर द्रवरूपात येतो आणि एलपीजीमध्ये सहज मिसळता येतो.
सध्या एलपीजीमध्ये 8 टक्के DME मिसळून यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. यामुळे एलपीजी वापरात मोठी बचत होऊ शकते.
एलपीजी आणि DME मिश्रणाचा संभाव्य परिणाम
| घटक | माहिती |
|---|---|
| भारताची एलपीजी आयात (2024) | 21 दशलक्ष टन |
| DME मिश्रण (8%) | मोठ्या प्रमाणात आयात कमी |
| वार्षिक परकीय चलन बचत | सुमारे 9500 कोटी रुपये |
| उज्ज्वला योजनेसाठी DME गरज | 1300 टन प्रतिदिन |
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 10.5 कोटी गॅस कनेक्शनसाठी 8% DME वापरल्यास मोठ्या प्रमाणावर इंधनाची गरज भागवता येईल. तसेच, यासाठी वेगळे सिलिंडर किंवा शेगडी बदलण्याची आवश्यकता नाही.
जगातील काही देशांमध्ये DME तयार केले जाते, मात्र ते प्रामुख्याने डिओड्रंट किंवा इतर औद्योगिक वापरासाठी असते. भारताने मात्र स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे इंधन म्हणून यशस्वीपणे DME विकसित केले आहे.
एनसीएल सध्या 6 ते 9 महिन्यांत 2.5 टन प्रति दिवस क्षमतेचा औद्योगिक प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर 500 ते 1000 टन प्रतिदिन क्षमतेचा व्यावसायिक प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा होईल.