‘लोकं काय म्हणतील’ याला फाट्यावर मारण्याची लकब सासूने दिलीय.. अशी सासू किती जणींच्या नशिबात मिळालीय? नक्की वाचा
Hello Kolhapur: लग्न करुन राजश्री पोवारांच्या घरात आले (नवऱ्याचं घर अस सहसा म्हणत नाही मी, राजश्री पोवार माझ्या सासूबाई, त्यांच्या जडणघडणीत रविराज पोवारांनी सगळं साम्राज्य उभं केलं त्यामुळं लग्न करुन मी आधी राजश्री पोवारांच्या घरात आले असं म्हणायला जास्त आवडेल)
तर इथं आले आणि स्वातंत्र्य म्हणजे काय असतं हे कळलं. लग्नाच्या अगदी दुसऱ्या दिवशी काहींनी बाजूला येऊन धमकावलं होतं, नवीन नवरी आहेस, रोज साडी नेसत जा, टिकली अशी नको तशीच लाव,डोक्यावर पदर हवाच..बसत नसेल डोक्यावर पदर तर पिन लावून फिक्स कर.
हे ऐकून मी सुन्न व्हायच्या आत सासुबाईंनी मला बाजूला घेतलं. म्हणाल्या, हे बघ इथं तुला तऱ्हेवाईक बायका भेटतील. काही घरातल्या, काही घराबाहेरच्या. त्या काहीबाही बोलतील तिकडे फक्त कानाडोळा कर. तुला हवं तसं रहा, ज्यात तुला मोकळं ढाकळं वाटेल ते घाल.
त्याच वेळी त्यांच्या समोर पायातल्या भयंकर रुतणाऱ्या जोडव्या काढल्या, हातातला चुडा काढला. अंगभर घातलेलं सौभाग्याचे दागिने काढले. साडीतून ड्रेस वर शिफ्ट झाले. मला अस बघून म्हणाल्या, झालीस ना मोकळी? तुझं हे मोकळेपण असंच ठेव या घरात. मला जे जगता आलं नाही ते सगळं तुला द्यायचंय मला.
एकवेळ सणवार, व्रतं वैकल्य, पाहुण्यात मान पान करू नको पण अडलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या मदतीला हातातलं सगळं सोडून जा. रोज घरात देवपूजा करू नको पण घरात आलेल्या प्रत्येकाचं हसतमुखानं स्वागत कर. आपल्या तिघांचा देव कधीच देव्हत्यात नाहीये हे लक्षात ठेव. माणुसकी जप, देव तुला जपेल.
त्या दिवशी मला जे काही फिल झालंय ते नाही शब्दांत मांडू शकत. तेव्हा ठरवलं, पोवार या नावाला जागायचंच. तेव्हापासून आजपर्यंत मिळालेल्या त्या प्रत्येक मोकळेपणात स्वतःला आणखी परिपक्व करत आले.
मी कधीच सुगरण नव्हते. आजही नाही. भाकरी करणं आजही जमत नाही मला. हे पाहून बऱ्याच जणींनी आपल्या लेकी सुनांचं कौतुक केलं. आमच्या लेकीला बाई पडेल ते काम अन् म्हणेल तितक्या लोकांचा स्वयंपाक करण्याची खूबी आहे अस सांगणाऱ्या बायकांच्या तोंडावर त्या छोटीशी स्माईल देऊन फक्त हसतात. यावर जेमतेम स्वयंपाक करतानाही त्यांनी एक गोष्ट ठणकावून सांगितली, फक्त पोटाला खायला करता येणं फारसं महत्वाचं नाहीये तर ते खायला कमावून आणण्यात खरा राम आहे.
बाकीच्या किती लेकी सुना त्यांच्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कमवण्याची धमक दाखवतात हे मला माहिती नाही. घर सोड, बाहेरचं जग बघ. माणसं बघ. माझा मुलगा कर्तबगार आहेच पण तूही तुझ्या पायावर उभी रहा. त्याच्याही एक पाऊल पुढे होऊन केलीस तरी आम्हा दोघांना त्याचा अभिमान असेल. एका स्वप्नाळू मुलीला यापेक्षा दुसरं काय हवं असतं आयुष्यात?
आज माझी छबी मागे न पाहता बिनधास्त आणि दिमाखात का चालवतेय माहितीय? त्यासाठी लागणारं बळ, तीक्ष्ण आणि स्पष्ट विचारप्रणाली आणि “लोकं काय म्हणतील” याला फाट्यावर मारण्याची लकब सासूने दिलीय. तू चालत रहा पुढं, मी मागचं सावरून घेतो हा विश्वास नवऱ्याने दिलाय.
आज हे सगळं सांभाळताना डोंगराएवढं नाही तर अगदी पर्वताएवढी संकटं सोबतीला आहेत. कोणत्याही काळात घट्ट असणारा सासूचा हातच आता ढिला झालाय. या काळात चिडचिड होतेय, त्रागा करुन घेणं होतंय. सगळं आलबेल चालू असताना हे आमच्याच वाट्याला का या प्रश्नानं डोकं सुन्न होतंय. पण त्यातही ढिला पडलेला तिचा हात, नजरेनं सगळं सांगतो. काळ अवघड आहेच पण यातून तरारुन उठाल हा विश्वास त्यांच्याकडूनच मिळतोय.
काही म्हणा, अशी सासू किती जणींच्या नशिबात मिळालीय माहिती नाही, पण मला लाभलीय याचा गर्व वाटतो.
असो.
मोकळं व्हायचं होतं खूप दिवस झालं. सुरुवात आपसूक सासूपासून झालीय.
माहित नाही, इथूनच का?
खूप दिवस परिस्थितीचा त्रागा, चिडचिड करुन घेणारी सुप्रिया आज जरा सकारात्मक वाटली आरशात पाहून.
हीच positivity बाहेर आणायची होती बहुतेक.
तुर्तास इतकंच.
– Supriya Dhapale Powar