वीरेंद्र मंडलिक यांचे शाहू छत्रपती घराण्याविषयी वादग्रस्त विधान, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता | Kolhapur Lok Sabha Election 2024
कोल्हापूर | गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर राजकीय वर्तुळात संजय मंडलिक यांच्यावर टीकची झोड उठली होती. यानंतर आता संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनीही छत्रपती घराण्यावर निशाणा साधला असून छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाला साजेसं काम केलं नाही, असे धक्कादायक विधान केलं आहे.
छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेस काम केलं नाही. ते काम जनक घराणे म्हणून विक्रमसिंह घाटगे आणि समरजित घाटगे यांनी केले आहे, असे वीरेंद्र मंडलिक म्हणाले. कागलमधील भाजपा पदाधिकारी मेळाव्यात वीरेंद्र मंडलिक यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.
वीरेंद्र मंडलिक म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने एक ही उद्योग छत्रपती कुटुंब काढू शकले नाहीत. गेल्या 12 ते 15 वर्षांपासून बंद पडलेली शाहू मिल देखील त्यांना सुरू करता आलेली नाही, असे सांगत वीरेंद्र मंडलिक यांनी छत्रपती कुटुंबावर निशाणा साधला. तसेच, राजर्षी शाहू महाराजांचे खरे जनक वारसदार समरजित घाटगे तुम्हीच आहात, असेही वीरेंद्र मंडलिक यावेळी म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असे विधान संजय मंडलिक यांनी केले होते. संजय मंडलिक यांच्या या विधानानंतर राजकीय तसेच सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. तसेच, इतिहास संशोधकांनी सुद्धा संजय मंडलिक यांनी केलेले विधान चुकीचे असल्याचे म्हटले होते. यातच पुन्हा मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी छत्रपती कुटुंबीयांबाबत केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.