प्रत्येक आईने आपल्या मुलीला असं ठणकावून सांगितलं तर.. अर्थात कदाचितच!
आमच्या ओळखीत एक ताई आहेत. घरकाम करतात. त्यांच्या मुलीचं लग्न झालं गेल्यावर्षी. लग्नाला जाता आलं नाही म्हणून मी दोन तीन महिन्यांनी गेले. चहापाणी झालं. आहेराचं पाकीट देऊन झालं. गप्पा चालूच होत्या की मी विचारलं,
“काय म्हणते पिंकी? रुळली का सासरी?”
“हो. रुळली.” – ताई
“माहेरपणाला येऊन गेली असेल ना?” – मी
“हो. आखाडाची माघारीण आणली होती.” – ताई
” जॉबला जाते ना?”- मी
“होय, नोकरी करते. चांगला पगार आहे. कशाला सोडायची.” – ताई
“सासरची मंडळी, सासुसासरे बरे आहेत ना?”
“होय वो. देवमाणसं आहेत. आमची पोरगीच तिकडं जाऊन लै हुशार झाली.” – त्या हसत हसत म्हणाल्या.
“पहिल्यापासून हुशारच आहे ना हो ती? तुमच्या घरात ग्रॅज्युएशन झालेली ती एकटीच पोरगी ना?” – मी
“होय. हुशार आहेच पण आता पोरींना लग्नानंतरचा जो जास्तीचा शहाणपणा येतो ना तो आलाय तिच्याकडे.” – ताई
“म्हणजे?”
“अहो, आता आलेली तर आपल्या भावजयला आणि मला ज्ञान वाटत होती.”- ताई
“अहो, काय सांगता?” मी हसत हसत विचारलं.
“माझा नातू पाहिलात ना किती लहान आहे तो! रात्री लवकर झोपत नाही त्यामुळे सूनबाईला लवकर झोपता येत नाही. ती सकाळी साडेसातला उठते. तोपर्यंत मी उठून केरवारा करून, पाणी येतं ते भरून ठेवते. ती उठली की नवऱ्याचा डबा तयार करते. तर पिंकी तिला म्हणते, लवकर उठत जा. माझ्या आईला सकाळी उठून कामं करावी लागतात. मला पण फोनवर असं नको, तसं वाग, वहिनीला डोक्यावर चढवून ठेवू नकोस असं काय बाय सांगत असते.” – ताई
“मग ?”
“मग काय? तिला म्हटलं, तू होतीस तोवर तुझ्या हातात चहाचा कप पण आणून द्यायचे मी. तेव्हा आपली आई दमते, थकते हे नाही कळलं?” – ताई
“मग ?”
“राग आला तिला. पण ताई, आम्ही दोघी सासवा सूना सगळी कामं करतो. आमचं आम्ही बघून घेऊ ना. ही रोज रोज उठून मला असं सांगत राहिली तर माझ्या डोक्यात कधीतरी येईलच ना? आणि मी सूनेला काही बोलून बसले तर आमचं नातं नाही का बिघडणार?” ताईंनी मलाच प्रश्न विचारला.
“पण तुम्ही सूनेशी इतक्या चांगल्या वागता, तुम्ही कशाला काय बोलाल सूनेला?” मी त्यांना विचारलं.
“तसं नाही वो ताई, एकसारखं तेच तेच ऐकून आपलं मत बदलू शकतं. दर दिवाळीत मोती साबणाची तीच तीच जाहिरात बघून एकदा तरी तो साबण आपण आणतो की नाही?” – ताई
“हो खरंय.” – मी
“यावेळी आली तेव्हा तिला खडसावून सांगितले की, बाय बघ हा शहाणपणा, ज्ञान, अक्कल सगळं तुला लग्नानंतर आलेलं आहे. त्यामुळे ते सगळं तिकडेच वापर आणि जोर लावून संसार कर. जशी तुला माझी काळजी वाटते ना तशी तुझ्या नंणदेला ही वाटत असेल. त्यामुळे तू तुझ्या सासुसासऱ्यांना सांभाळ. आम्हाला संसार करायला शिकवू नकोस. मी अठ्ठावीस वर्षे आणि तुझी भावजय चार वर्षे संसार करतोय. तूच यात नवीन आहेस तर तू निगुतीने संसार कर. माहेरपणाला ये, आम्ही जी मीठभाकरी खातो ती आनंदाने खा. आनंदाने रहा आणि आनंदाने सासरी जा. सासरी कोणी त्रास दिला तर मात्र सांग. त्यांना जाब विचारायला मी खमकी आहे.” – ताई पोटतिडकीने बोलत होत्या.
“म्हणूनच तिला राग आला असेल.” – मी
“येऊ देत हो. या अल्लड पोरी. शिकतात, नोकरी करतात. आईबाप आपल्यापेक्षा वरचढ स्थळ पाहून लग्न करून देतो. लग्न झालं की ह्यांना वाटतं आपण एकदम मोठे झालो. मग आईबापाला, भावाला, भावजयला ज्ञान द्यायला लागतात. ती गुलाब माहिती आहे का तुम्हाला?” – ताईंनी मध्येच विचारलं.
“हो. तिचं काय?”
“तिने पण लेकीचं लग्न करून दिलं. लेक रोज फोन करून आईला ज्ञान द्यायची. तिचं तसंही सूनेशी जरा अधुनमधून वाजायचं. लेकीने हवा दिली. ही रोज सूनेशी भांडायला लागली. शेवटी कंटाळून पोराने बायकोला घेऊन वेगळं घर केलं. आता गुलाब एकटीच राहते. आणि लेक आपल्या पोरांच्या व्यापात अडकली. आईशी बोलायला वेळ नाही. तेव्हाच मी शहाणी झाले. माझी सून तशी गुणाची आहे हो. कधी काळी रागावले तर डोळ्यात पाणी काढेल पण उलट उत्तर नाही करणार. ‘आई, आई’ करत मागे येते. मग मलाच वाईट वाटतं. हल्ली सिरीयलमध्ये दाखवतात ना, आपलं चुकलं की सॉरी म्हणायचं. मी पण म्हणते सूनेला ” – ताई
“तुमची सून खरंच चांगली आहे हो. ” – मी
“हो ना!” –
ताईंच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. मी यायला निघाले. मला माझी आई आठवली. आमची लग्न लावून दिली तेव्हा आम्हाला सांगितलं, ‘सासरच्या बारीकसारीक कागाळ्या, चहाड्या सांगत यायचं नाही. आपल्या पध्दतीने तिथेच राहून सोडवायच्या.’ आणि त्याचवेळी सासरच्या मंडळींना सांगायची की, ”तुम्ही मागणी घातली म्हणून मुलगी देतेय. आम्ही टोपलीत पोरगी घेऊन तुमच्या दारात आलो नाही. माझी मुलगी जड झाली म्हणून तुम्हाला देत नाही. त्यामुळे पोरीला त्रास होता कामा नये.”
एक ती पिढी आणि आता ही पिढी. पण ताई म्हणजे आमच्या आईची सुधारित आवृत्ती वाटल्या. मला वाटतं प्रत्येक आईने आपल्या मुलीला असं ठणकावून सांगितलं तर घर तुटणार नाही कदाचित.
अर्थात कदाचितच!
कारण घर तितक्या व्यक्ती आणि व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रत्येकाचे अनुभव वेगळे.
तुम्ही काही म्हणा, तुम्हाला आवडो न आवडो पण मला स्वतःला मात्र मावशींचं वागणं फार आवडलेलं आहे. काय समजलीव ?