NewsAgriculture

आता पोस्टाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बागेतील आंब्याची चव थेट देश-विदेशातील ग्राहकांना चाखता येणार! Farm to fork

कोकणातील हापूस आंबा देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी भारतीय डाक विभागाने 'फार्म टू फोर्क' ही नावीन्यपूर्ण संकल्पना आणली आहे.

कोकणातील हापूस आंबा जगभरात प्रसिध्द आहे. त्यामुळेच हापूस जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय डाक विभागाने ‘फार्म टू फोर्क’ (Farm to fork) ही नावीन्यपूर्ण संकल्पना आणली आहे. याद्वारे बागांमधून थेट देश- विदेशातील आंबाप्रेमींना दर्जेदार हापूस घरपोच पोहोचवण्यात येणार आहे. यासाठी ‘आपका दोस्त इंडिया’ ही टॅगलाईन देण्यात आली आहे.

डाक विभागाच्या या विशेष सेवेचे दर इतर खासगी कुरिअर सेवांपेक्षा कमी आहेत. त्यामुळे कमी दरात ग्राहकांसाठी आंबे घरोघरी पोहोचवण्यात येणार आहेत. नवी मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक मोहम्मद साहिद यांनी याबाबत सांगितले की, फळांचा राजा हापूसला ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी डाक विभागाने ही एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

यासाठी नवी मुंबई डाक विभागाने मे. बेरिडेल फुड्स प्रा. लि. या खासगी कंपनींसोबत करार केला असून, त्याद्वारे शेतातील ताजे व दर्जेदार हापूस आंबे थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. भारतीय देशांतर्गत बाजारपेठेव्यतिरिक्त जपान, यूएसए, ऑस्ट्रेलिया, कोरिया प्रजासत्ताक, सिंगापूर आणि युरोप या देशांमध्ये कंपनीने आपल्या फळांची निर्यात केली आहे.

‘रेल डाक गतीशक्ती’चा वापर करण्याचे आवाहन
भारतीय डाक विभागाच्या ‘रोड ट्रान्सपोर्ट नेटवर्क’च्या माध्यमातून आतापर्यंत १२०० किलो वजनाच्या ३८० आंब्यांच्या पेट्यांची घरपोच डिलिव्हरी झाली आहे. आंबा उत्पादक शेतकरी आणि पुरवठादारांनी व्यवसाय वाढीसाठी डाक विभागाच्या पार्सल सेवेचा तसेच डाक विभाग आणि भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने पुरवण्यात येणाऱ्या रेल डाक गतीशक्ती योजनेचा वापर करावा, असे आवाहन मोहम्मद साहिद यांनी केले आहे.

‘या’ कंपनीसोबत सामंजस्य करार
मे. बेरिडेल फुड्स प्रा. लि. ही जपानला आंबे निर्यात करणाऱ्या सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक आहे. भारतीय डाक विभाग आणि प्रसिद्ध आंबा निर्यातदार मे. बेरिडेल फुड्स प्रा. लि. यांच्यातील सामंजस्य करार हा आंबा पुरवठा क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरणार असून, या भागीदारी अंतर्गत कंपनी फक्त भारतातील ग्राहकांनाच नाहीतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांनासुद्धा भारतीय डाक विभागामार्फत दर्जेदार आंबे पोहचू शकणार आहेत.

Back to top button