Onion Market 2024 : ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीची केवळ घोषणा; सरकारकडून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक
नाशिक | ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीची (Onion Market 2024) घोषणा नावापुरतीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत 7 मे पासून 50 खरेदी केंद्रांवर ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून 5 लाख टन रब्बी कांदा खरेदीची घोषणा करण्यात आली होती.
पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा करण्यात आली होती. यावेळी आचारसंहितेच्या काळातही सरकार शेतकऱ्यांसाठी किती कामे करत आहे असा, सूर पत्रकार परिषदेत दिसून आला होता. मात्र या वेळी केलेली कांदा खरेदीची घोषणा नावापुरतीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ निवडणूक काळात मतांवर डोळा ठेवून सरकार घोषणा करत असल्याची टीका यामुळे कांदा उत्पादकांमधून होऊ लागली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा प्रश्न तापल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी मागे घेतल्याचा गाजावाजा केला. प्रत्यक्षात प्रतिटन 550 डॉलर किमान निर्यात मूल्य व 40 टक्के निर्यात शुल्क आकारले. यामुळे निर्यातीचा फायदा होण्याऐवजी तोट्याच झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन्ही केंद्रीय खरेदीदार संस्थांच्या माध्यमातून एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कांदा खरेदी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र खरेदीस अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. ‘एनसीसीएफ’चे अध्यक्ष विशाल सिंग हे 5 मे रोजी नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी पिंपळगाव बसवंत येथील सुखशांती शेतकरी उत्पादक कंपनीच्या गोदामात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन 7 मे पासून कांदा खरेदी सुरू होईल या बाबत आश्वस्त केले. यावेळी त्यांनी 50 खरेदी केंद्रावर कांदा खरेदी होईल शिवाय शेतकऱ्यांना 72 तासांच्या आत थेट खात्यावर पैसे मिळतील, असा दावाही केला होता. या बाबत अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे समोर आले आहे.