News

कॅनडामध्ये रस्ता अपघातात तीन भारतीयांचा मृत्यू | Canada Road Accident

कॅनडा | ओंटारियो प्रांतामध्ये झालेल्या रस्ते अपघातात (Canada Road Accident ) एक भारतीय दाम्पत्य आणि त्यांच्या तीन महिन्यांच्या नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका मद्याच्या दुकानावर दरोडा टाकणाऱ्या गुन्ह्यातील संशयित चुकीच्या दिशेने वाहन चालवत आल्यामुळे किमान सहा वाहनांना अपघात झाला. यामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील पोलिसांनी गुरुवारी प्रस्तुत केलेल्या निवेदनात दिली आहे.

टोरांटोच्या पूर्वेला साधारण ५० किलोमीटर अंतरावर व्हिटबी येथे सोमवारी ही दुर्घटना घडली. मात्र, पोलिसांनी मृतांची ओळख जाहीर केलेली नाही. या घटनेतील मृत बालक, त्याचे वडील, आई, आजी आणि आजोबा एकाच वाहनातून प्रवास करत होते. त्यावेळी चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनामुळे सहा वाहनांची आपापसात धडक झाली. त्यामध्ये आजी, आजोबा आणि बालक यांचा जागेवरच मृत्यू झाला तर बाळाच्या आईला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत दाम्पत्य भारतातून कॅनडामध्ये काही दिवसांपूर्वी आले होते. अपघाताला कारणीभूत झालेला दरोड्यातील संशयितचा देखील जागेवरच मृत्यु झाला. तर त्याच्या वाहनातील अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने बोमनविले येथे एका मद्याच्या दुकानात दरोडा टाकल्यानंतर पोलीस त्याच्या वाहनाचा पाठलाग करत होते. सुमारे २० मिनिटानंतर तो हायवे ४०१वर चुकीच्या दिशेने घुसला. यावेळी त्याच्या भरधाव वाहनाने अन्य वाहनांना धडक दिल्याने अपघात झाला. या अपघाताच्या तपासासाठी सात जणांचे पथक तयार करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या निवेदनात देण्यात आली आहे.

Back to top button