लातूर | तलाठी भरती (Talathi Bharti 2024) घोटाळ्या संदर्भात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. यामुळे प्रामाणिकपणे परिक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थांच्यात संतापाची लाठ उसळली आहे. तलाठी भरतीसाठी तब्बल दहा लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज भरले होते तर जवळपास आठ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परंतु या परिक्षेमध्ये गोंधळ झाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. परंतु आता तलाठी भरती घोटाळ्याला निर्णायक वळण मिळाले असून लातुरातील अख्खे परीक्षा केंद्रच मॅनेज असल्याची माहिती समोर आली आहे.
तलाठी भरतीत 4,600 पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. टीसीएस आयओएन कंपनी मार्फत यासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेनंतर 5 जानेवारी 2024 रोजी सर्व उमेदवारांच्या गुणांचे सामान्यकरण करून जिल्हानिहाय निवड याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. गुणांच्या सामन्यकरणावरून मोठा गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले होते. यामध्ये परिक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीचे कर्मचारी देखील सामील असल्याचे स्पष्ट झाले होते.
Talathi Bharti 2024
आता लातूर शहरातील गुरू ऑनलाईन परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. परीक्षा केंद्रातील कर्मचारी किंवा केंद्राचा मालक यात सहभागी असल्याचा संशय आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे धाराशिव जिल्ह्यातील तलाठी भरतीत टॉपर असलेल्या काही उमेदवारांबाबत अनेक पुरावे होते, त्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत विस्तृत तक्रार दिली होती. परीक्षा देणाऱ्या उमेदवाराच्या कॉम्प्युटरचा एक्सेस एनी डेस्क, टीम व्ह्युअर किंवा तत्सम सॉफ्टवेअरचा वापर करून दुसऱ्या कॉम्प्युटरवर देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते.
तलाठी भरतीत लातूर येथील परीक्षा केंद्रावरून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली होती. पण फक्त धाराशिव येथील टॉपर उमेदवारांवर कार्यवाही झाली आहे. परंतु इतर जिल्ह्यातील टॉपर सुध्दा यात सामील असल्याने त्यांची चौकशी कधी असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विचारला आहे.
त्या शिफ्ट मधील 0.1% टॉपर उमेदवारांचे गुण सामान्यकरण प्रक्रियेत वापरले गेले होते, पण आता टॉपर उमेदवारच घोटाळेबाज असल्यामुळे दिलेल्या गुणांच्या आधारे तलाठ्यांना नियुक्त्या देणार तरी कशा असा सवाल उमेदवार विचारात आहेत. सदर गैरप्रकाराचा तपास न्यायालयीन चौकशी समिती व्दारे करावा म्हणून याआधीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता उच्च तंत्रज्ञानाने घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने या पदभरतीचा तपास एसआयटी व्दारे करावा अशी मागणी होत आहे.
तलाठी भरतीत लातूर येथील परीक्षा केंद्र, त्या परीक्षा केंद्राच्या मालकानेच मॅनेज केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान वापरून उमेदवारांचे पेपर सोडवले गेले आहेत. महाराष्ट्रातील तलाठी भरती मधील अनेक जिल्ह्यातील टॉपर लातूर केंद्रावरून गैरप्रकार करून उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा केंद्राशी निगडित व्यक्तीचा पुतण्या, बहीण आणि इतर नातेवाईकांना गैरप्रकार करून उत्तीर्ण करण्यात आले आहे.
“आता फक्त धाराशिव जिल्ह्यातील टॉपर बद्दल खुलासा केला आहे, येत्या काळात इतर जिल्ह्यातील टॉपर बद्दल पुरावे सादर केले जातील. आमच्याकडे आता अनेक पुरावे असून याबाबत आम्ही उच्च न्यायालयात याचिका सुध्दा दाखल केली आहे. इतका मोठा घोटाळा झाला असतानाही महसूल विभाग घोटाळेबाजांना नियुक्त्या देणार आहे. त्यामुळे या घोटाळ्याची एसआयटी चौकशी झाल्याशिवाय कोणालाही नियुक्त्या देण्यात येऊ नये”, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केली आहे.
तलाठी भरती दोन हजार उमेदवारांचे भवितव्य अधांतरी!- Talathi Bharti 2024
परीक्षेतील २३ जिल्ल्यांमधील उमेदवारांची निवड व प्रतीक्षायादी २३ जानेवारीला रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाने जाहीर केली असून, चालू आठवड्यापर्यंत संबंधित उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात येणार आहे. मात्र, आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे. त्यामुळे या १३ जिल्ह्यांमधील तलाठी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सुमारे दोन हजार उमेदवारांचे भवितव्य तूर्त अधांतरीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील २३ जिल्ह्यांतील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू आहे.
तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी अंती ४४६६ जागांसाठी १० लाख ४९ हजार ७१३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांकडून हरकती, आक्षेप मागविणे, त्यांचे निराकरण आदी प्रक्रिया पूर्ण करून तलाठी भरती परीक्षेची गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली आणि भरतीचा पुढील टप्पा म्हणून २३ जानेवारीला रात्री उशिरा राज्यातील २३ जिल्ल्यांमधील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली.
या २३ जिल्ह्यांमधील निवड यादीत अराखीव, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अशा विविध प्रवर्गातील सुमारे २५२६ उमेदवार आहेत. या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे पडताळणी, चारित्र्य पडताळणी आणि परीक्षेला जाताना उमेदवारांनी जो अंगठा यंत्रावर दिला आहे, निवड झालेल्या उमेदवाराचा आणखी एकदा अंगठा घेऊन परीक्षेला बसलेला आणि निवड झालेला उमेदवार तोच आहे किंवा कसे? आदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यापैकी पडताळणीत संबंधित उमेदवार गळाल्यास तातडीने प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला निवड समिती पाचारण करत आहे. ही सर्व प्रक्रिया होऊन पुढील आठवड्यापासून नियुक्तीपत्रांचे वाटप करण्याचे नियोजन आहे.
मूळ ओळखपत्र (मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स) पडताळणी वेळी सादर करावे. https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याचा पुरावा. दिव्यांग, खेळाडू, अनाथ, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन या समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज केलेल्यांनी विहित नमुन्यातील मूळ प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, चारित्र्य व पूर्वचारित्र्य पडताळणीसाठी सोबतच्या परिशिष्ट- क मध्ये जोडलेला साक्षांकन नमुना परिपूर्ण भरून (दोन प्रतीत) प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सादर करावा.
कोणत्याही आरक्षणाचा अथवा सोयी-सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कायदा/ नियम/आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. मागासवर्ग (अ.जा./अ.ज. वगळून) प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी भरलेला सेतू कार्यालयातील अर्ज व सादर केलेली सर्व कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस दोन प्रतीत स-साक्षांकित करून सादर करावीत. पडताळणीस अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांना तलाठी भरती २०२३ मधील निवड प्रक्रियेकरिता दावा करता येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे सचिव शिवकुमार स्वामी यांनी म्हटले आहे.
- सोमवारी (ता. पाच) ११ वाजता : निवड यादीतील अराखीव (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी.
- मंगळवारी (ता. सहा) : दुपारी एक वाजता निवड यादीतील इमाव, विमाप्र, भजड, भजकभजब, विजाअ, अज, अजा प्रवर्गातील उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासणी होईल.
- बुधवारी (ता. सात) : सकाळी ११ वाजता प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवार तसेच तलाठी भरतीच्या अनुषंगाने निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी.
- गुरुवार (ता. आठ) : सकाळी ११ वाजता निवड यादीमधील सर्व सामाजिक प्रवर्गांतील सर्व उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी.