News

ब्रिटनच्या स्थानिक निवडणुकीत ऋषी सुनक यांना धक्का; हुजूर पक्षाची पीछेहाट | PM Rishi Sunak

लंडन | ब्रिटनमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुका आणि महत्त्वाच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी हुजूर पक्षाची पीछेहाट झाल्यामुळे पंतप्रधान ऋषी सुनक (PM Rishi Sunak) यांना मोठा धक्का बसला आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये सत्ताधारी हुजूर पक्षाने गेल्या ४० वर्षांतील सर्वात वाईट कामगिरी नोंदवल्याचे गुरुवारी रात्रीपासून येत असलेल्या निकालातून स्पष्ट होत आहे. रविवापर्यंत संपूर्ण निकाल समजण्याची अपेक्षा आहे.

विरोधी मजूर पक्षाने स्थानिक निवडणुकांमध्ये निर्णायक आघाडी घेतली आहे. त्याबरोबरच ब्लॅकपूल साऊथ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मजूर पक्षाच्या ख्रिस वेब यांनी हुजूर पक्षाच्या डेव्हिड जोन्स यांचा पराभव केला. हुजूर पक्षाकडून मजूर पक्षाकडे तब्बल २६ टक्के मते गेली असल्याचे मतमोजणीतून समोर आले आहे.

ब्रिटनमध्ये १९४५पासून झालेल्या पोटनिवडणुकांमधील हा तिसऱ्या क्रमांकाचा मतदार बदल आहे. मजूर पक्षाचे नेते किअर स्टार्मर यांनी या विजयाचे वर्णन ‘भूकंपासमान’ असे केले असून, या वर्षांच्या अखेरीस होणाऱ्या पार्लमेंटच्या निवडणुकीतही मजूर पक्षाचीच सरशी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

ते म्हणाले की, ‘‘ऋषी सुनक यांच्यासाठी संदेश स्पष्ट आहे. ही बदलाची वेळ आहे, ही सार्वत्रिक निवडणुकीची वेळ आहे’’. दुसरीकडे, या निकालांमुळे सुनक यांच्यावर पक्षांतर्गत दबाव वाढत असून स्वपक्षीय विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Back to top button