News

पंतप्रधान मोदी यांना फक्त एक फोन लावू द्या… आरक्षण जाहीर झाल्याचा कागद 4 वाजेपर्यंत येईल! मनोज जरांगे पाटील यांचं विधान काय? Manoj Jarange Patil

जालना | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज पुन्हा एकदा आमरण उपोषण करत आहेत. राज्य सरकारला आरक्षणासाठी 40 दिवसांची मुदत दिली होती. पण या मुदतीत सरकारने काहीच न केल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचे हत्यार उपसले आहे. अंतरवली सराटीतच हे उपोषण होणार आहे.

मनोज जरांगे यांच्या उपोषणा दरम्यान राजकीय नेत्यांना गावबंदी असणार आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच आरक्षण देण्यास निरुत्साही आहे. त्यामुळेच आरक्षण दिले जात नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हणटले आहे. मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण अडवतंय? असा सवालच मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पंतप्रधान मोदी यांना फक्त एक फोन लावू द्या

यावेळी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की, आम्ही मागेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरक्षणाच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. हा विषय गंभीर आहे. मराठा समाजाची संख्या मोठी आहे. त्यामुळे याची दखल घ्या. पूर्वी वाटायचे मोदींना गोरगरीबाच्या प्रश्नांची जाण आहे. पण ते खरोखरच गरीबांची दखल घेतात का याची थोडीशी शंका आहे, असे सांगतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदींना बैठक घ्यायची गरज नाही. त्यांचा एक फोन या तिघांना येऊ द्या. आरक्षण जाहीर झाल्याचा कागद 4 वाजेपर्यंत नाही आला तर बघा. दणादणा पळत येतील. आरक्षण दिल्याची ब्रेकिंग बातमी होईल, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

गिरीश महाजन तर 15 दिवसात आरक्षण देणार होते

मराठा आरक्षणाबाबत सरकार निरुत्साही दिसत आहे असे म्हणावे लागेल. गिरीश महाजन तर 15 दिवसात आरक्षण देतो म्हणाले होते. आता मुंबईत चला, आरक्षण मिळवून तुम्हाला दोन तासात परत आणून सोडतो असे महाजन म्हणाले होते. मी म्हटले मी येत नाही. मी इथेच बरा आहे. ते 15 दिवसात आरक्षण देणार होते, आज 41 वा दिवस आहे. अजूनही आरक्षण नाही. याचा अर्थ काय? आम्ही शांतते आंदोलन करणार आहोत. कुणीही उग्र आंदोलन करू नका. आपल्या जातीवर अन्याय होऊ नये म्हणून मी उपोषणाला बसत आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

त्यांचा फोन म्हणून घेतला नाही

दोन दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांचा फोन आला होता. फोन उचलला होता. पण माझा मोबाईल मित्राकडे होता. लोकांना भेटण्याच्या नादात त्यांना परत फोन करायचे राहून गेले. परत त्यांचाही फोन आला नाही. काल ही लोकांमध्ये होतो. त्यामुळे फोन करता आला नाही. त्यात काय असणार आहे? नुसते बोलणार होते की आरक्षणाचा जीआर काढला हे महाजन सांगणार होते? कायदा पारित झाला असे थोडीच सांगणार होते. तसे असेल तर लगेच फोन लावतो, असा टोला त्यांनी महाजन यांना लगावला.

संभाजीराजेंची भेट घेणार

छत्रपती संभाजी राजे हे आज दुपारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती संभाजी आणि उदयनराजे भोसले हे आमचे राजे आहेत. आम्ही त्यांचे स्वागतच करू. दोन्ही राजांचा आशीर्वाद घेऊ, असे त्यांनी सांगितलं.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील संपूर्ण मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकारच्या दुर्लक्षित वृत्तीमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापल्याचे दिसत आहे.

आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहे. या आंदोलनादरम्यान जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी दिला होता. जरांगे यांनी दिलेली मुदत संपत आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्हा पातळीवर आजपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

Back to top button