8 महिन्यांत MPSC ची महाभरती, एकूण 21 हजार पदांची होणार भरती | MPSC Recruitment 2023
मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) रखडलेल्या भरती (MPSC Recruitment 2023) प्रक्रियेला वेग मिळाल्याने तब्बल 21 हजार पदांच्या मेगाभरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. बहुतांश पदांच्या जाहिराती निघाल्या असून, पुढील आठ महिन्यांत भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल.
MPSC Recruitment 2023
राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडून जागा भरण्यासाठी जशी मागणीपत्रे येतात, त्यानुसार आयोग भरती प्रक्रिया राबवते. गेल्या वर्षभरात राजपत्रित ‘अ’, ‘ब’ आणि अराजपत्रित ‘ब’ गटासह लिपिक पदांकरिता तब्बल 21 हजार पदे भरण्याची मागणी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून करण्यात आली. या पदांची भरती प्रक्रिया विविध टप्यांवर आहे. येत्या आठ महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली आहे.
यातील सर्वाधिक 8 हजार पदे लिपिकांची आहेत. तर अ गटापैकी सर्वाधिक 2 हजार पदे वैद्यकीय शिक्षण विभागातील आहेत. डिसेंबरपर्यंत यात आणखी भर पडेल. आयोगाने इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच भरती प्रक्रिया राबविली नव्हती. केवळ मुंबईतील लिपिक पदे आयोगाकडून भरली जात होती. परंतु, आता मुंबईबाहेरील लिपिक पदेही आयोगाकडून भरण्यात यावी, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आल्याने यंदा इतक्या मोठ्या संख्येने लिपिक पदे भरली जात आहेत.