CareerNews

जलसंधारण परिक्षेचा पेपर फुटला, विभागाच्या अधिकाऱ्यानेच फोडली प्रश्नपत्रिका! Jalsandharan Vibhag Bharti 2024

मुंबई | राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परिक्षेच्या दुसऱ्या दिवशी पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून विद्यार्थी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार विविध पदांसाठी परीक्षा सुरू झाली आहे. यासाठी मृद व जलसंधारण विभागाने ९ फेब्रुवारी रोजी परीक्षेची तारीख जाहीर केली. ही परिक्षा २० व २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. तीन सत्रामध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी अमरावती येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, मृद व जलसंधारण विभागाच्या एका कर्मचाऱ्यानेच ही प्रश्नपत्रिका फोडून उत्तरे पुरवण्यास मदत केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

ही परीक्षा संगणक आधारित असून प्रत्येक सत्राच्या प्रश्न पत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार आहेत. एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. पहिले सत्र ते अंतिम सत्र या मधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठीण्यता यांचे समानीकरण करण्याचे पध्दतीने गुणांक निश्चीत करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ते सर्वांना बंधनकराक राहिल. याची सर्व नोंद घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेच्या पहिल्याच सत्रात प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आली आहे.

एका अधिकाऱ्याने ही प्रश्नपत्रिका फोडण्यास मदत केली आहे. याचे पुरावेही काही विद्यार्थ्यांनी बाहेर पाठवले आहेत. काही दिवसांआधीच तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र, अद्यापही या परीक्षेतील गोंधळ सुटलेला नाही. तलाठी भरतीमध्येही मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे अनेक पुरावे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून दिले जात आहेत. मात्र, शासनाकडून यावर अद्यापही यावर कठोर कारवाई केली गेली नाही. त्यानंतर आता मृद व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी पदासाठी बुधवारी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.

Back to top button