Blog

कुणबी दाखला कसा काढायचा? त्यासाठी कोणते पुरावे ग्राह्य धरणार? जाणून घ्या सविस्तर | How to get Kunbi Certificate

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल, अशी मागणी मनोज जारंगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर केली. सुरुवातीला मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या जरांगे पाटील यांनी नंतर संपूर्ण राज्यातील मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात व्यापल्याने महाराष्ट्र सरकाराला झुकावे लागले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला तातडीने एक जीआर काढावा लागला. मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक ते अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढवण्यात आली. असे या नव्या जीआरमध्ये म्हटले आहे. संपूर्ण राज्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने जीआर काढल्यामुळे कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी मराठा समाजातील लोकांची धावपळ सुरू झाली आहे. परंतु कुणबी प्रमाणपत्र कसे काढतात याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.. म्हणूनच आज आम्ही आपल्याला याबद्दलची सविस्तर माहिती देत आहोत..

How to get Kunbi Certificate

कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील/चुलते/आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते/आत्या, आजोबांचे चुलते/आत्या, पणजोबांचे चुलते/आत्या, खापर पणजोबांचे चुलते/आत्या यापैकी कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.

कुणबी पुरावा मिळवण्यासाठी काय करावे?
रक्तसंबंधातील नातेवाइकांचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का तपासावे. स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्ममृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. 14 मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जात असत. 1 डिसेंबर 1963 पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. आपल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाइकाचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नं. 14 किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करून त्यात कुणबी नोंद आहे का हे तपासावे.

आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी (6 ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, 7/12 उतारे, 8अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अमलात येण्याआधी असणारे क. ड. ई. पत्र, सूडपत्र, खासरा पत्रक, हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का? हे तपासावे, आणि तसा उल्लेख असेल तर ते कागदपत्र कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी उपयुक्त आहे.

रक्तसंबंधातील नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा ग्राह धरला जाईल. रक्तसंबंधातील नातेवाइकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल.

कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारने काढलेल्या नवीन जीआर मध्ये काय आहे?

आता आपण कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारने काढलेल्या नवीन जीआर मध्ये कोणकोणत्या बाबींचा उल्लेख आहे आणि यासाठी कोणकोणते पुरावे सादर करावे लागणार आहेत याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

शासनाने स्थापित केलेल्या शिंदे समितीने 12 विभागातील पुरावे कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्राह्य धरले जातील असे स्पष्ट केले आहे.

  • पहिला पुरावा – महसुली दस्तऐवज : खासरा पत्रक, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, पाहणी पत्रक, नमुना नंबर एक हक्क नोंद पत्रक, क पत्रक, नमुना नंबर दोन हक्क नोंद पत्रक, कुळ नोंदवही, सातबारा उतारा यांसारख्या महत्त्वाच्या नोंदीमध्ये कुणबी असा उल्लेख असेल तर कुणबी जात प्रमाणपत्रासाठी हा पुरावा ग्राह्य धरला जाईल.
  • दुसरा पुरावा – जन्म व मृत्यू रजिस्टर : रक्त संबंधातील नातेवाईकांचा जन्म व मृत्यू झालेल्या गावातील संबंधित तहसीलमध्ये अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नंबर 14 किंवा कोतवाल बुक नक्कल मध्ये जर कुणबी असा उल्लेख असेल तर हा पुरावा देखील कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी उपयोगी येणार आहे.
  • तिसरा पुरावा – शैक्षणिक दस्तऐवज : रक्त संबंधामधील नातेवाईकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यात जर कुणबी असा उल्लेख असेल तर हा पुरावा देखील कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी उपयोगी येणार आहे.
  • चौथा पुरावा – राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील दस्तऐवज : अनुज्ञप्ती नोंदवही, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना अभिलेख यामध्ये जर कुणबी असा उल्लेख असेल तर हा देखील पुरावा प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.
  • पाचवा पुरावा – कारागृह विभागाचे दस्तऐवज : रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिजनर, कच्च्या कैद्यांची नोंदवही यामध्ये जर कुणबी असा उल्लेख असेल तर हे दस्तऐवज देखील प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
  • सहावा पुरावा – पोलीस विभागाचे दस्तऐवज : गाववारी, गोपनीय रजिस्टर सी एक आणि सी दोन, क्राइम रजिस्टर, अटक पंचनामे आणि एफ आय आर रजिस्टर यामध्ये जर नोंद असेल तर हे पुरावे देखील कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरले जातील.
  • सातवा पुरावा – सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील दस्तऐवज : खरेदीखत नोंदणी रजिस्टर, डे बुक, करारखत, साठेखत, इसार पावती, भाडे चिट्ठी, ठोकपत्रक, बटाई पत्रक, दत्तक विधान पत्रक, मृत्युपत्रक, इच्छापत्रक, तडजोड पत्रक तसेच या विभागातील इतरही अन्य जे महत्त्वाचे दस्तऐवज आहेत त्यामध्ये जर नोंद असेल तर हे पुरावे देखील कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी वैध घरातील.
  • आठवा पुरावा – भूमी अभिलेख विभागाकडील महत्त्वाचे दस्तऐवज – पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला प्रति बुक, रिविजन प्रतिबुक, क्लासर रजिस्टर व हक्क नोंदणी पत्रक यामध्ये जर नोंद असेल तर हा पुरावा देखील यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.
  • नववा पुरावा – जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडील दस्तऐवज : माजी सैनिकांच्या नोंदीमध्ये कुणबी नोंद आढळल्यास हा पुरावा देखील हे प्रमाणपत्र काढण्यासाठी उपयोगी ग्राह्य धरले जाणार आहे.
  • दहावा पुरावा – जिल्हा वक्फ अधिकारी : यांच्याकडील मुंतखब या कागदपत्रात जर कुणबी नोंद असेल तर हा देखील महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.
  • अकरावा पुरावा – शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा तपशील रेकॉर्ड : यामध्ये रक्त संबंधातील नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्विस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाईकांची कुणबी जात नोंद केलेली असेल तर हा पुरावा देखील कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. परंतु हे रेकॉर्ड 1967 पूर्वीचे असणे या ठिकाणी आवश्यक राहणार आहे.
  • बारावा पुरावा – जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील दस्तऐवज : जर रक्तसंबंधांमधील नातेवाईकाचे आधीच कुणबी जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असेल आणि कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट असेल तर हा पुरावा देखील कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.

कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी कुठे अर्ज करणार?

  • जात प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया ही एकच असते.
  • कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया देखील इतर समाजाचे जात प्रमाणपत्र काढण्यासारखीच आहे.
  • यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो.
  • वर दिलेल्या बारा पुराव्यांमध्ये जर कुणबी अशी नोंद असेल तर संबंधित व्यक्ती या पुराव्यानिशी त्यांच्या तहसील कार्यालयात अर्ज सादर करू शकतात.
  • तहसील कार्यालयात अर्ज सादर झाल्यानंतर सदर अर्जाची पडताळणी प्रांत अधिकारी यांच्या माध्यमातून केली जाते.
  • यानंतर प्रांत अधिकारी यांच्या सहीने संबंधित व्यक्तीला जात प्रमाणपत्र दिले जाते.
Back to top button