Govt. Scheme

आता घरबसल्या काढा उत्पन्नाचा दाखला; याठिकाणी करा अर्ज.. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया! How to get income certificate?

मुंबई | केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास उत्पन्नाची अट निश्चित करण्यात येते. शिक्षण घेताना देखील विद्यार्थ्यांना विविध सरकारी योजना, शिष्यवृत्ती याचा लाभ घ्यायचा असेल तर उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागतो. 

मात्र, हा उत्पन्न दाखला अर्थातच इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी सर्वसामान्यांना मोठी अडचण येते. उत्पन्न दाखला काढण्यासाठी अनेकांकडून एजंट लोकांकडून मोठी रक्कम वसूल केली जात असते. यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक तर होतेच शिवाय वेळही वाया जातो. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी घरबसल्या उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा (How to get income certificate?) याविषयी माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया..

उत्पन्नाचा दाखला हा जवळच्या तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्र किंवा आपले सरकार पोर्टलवरुन काढता येतो. (How to get income certificate from Aaple Sarkar). तुम्हाला जो पर्याय सोईचा वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही हे प्रमाणपत्र घरबसल्या मिळवू शकता.

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्जाचा नमुना (?Click करा)

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा : पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो असणारे सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं, अर्जदाराचा फोटो.

पत्ता दर्शवणारा पुरावा : पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी एक कागदपत्र.

वैद्यकीय मदत मिळवायची असल्यास किंवा वैद्यकीय कारणासाठी उत्पन्नाचा दाखला लागणार असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र.

स्वंयघोषणापत्र : उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी स्वंयघोषणापत्र भरुन द्यावे लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावे लागते.

उत्पन्न दाखवणारी कागदपत्रे : प्राप्तिकर परतावा भरल्याचे प्रमाणपत्र, मंडल अधिकाऱ्याचा तपासणी अहवाल, नोकरदारांसाठी फॉर्म नंबर 16, निवृत्त पेन्शनधारकांसाठी बँक प्रमाणपत्र, अर्जदार शेतकरी असल्यास 7/12 आणि 8 अ चा उतारा

आपले सरकार पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

आपले सरकारवर नवीन वापरकर्ता नोंदणी या लिंकवरुन नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुमचे लॉगीन तयार करुन घ्या. लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग पाहायला मिळतील त्यातून तुम्ही महसूल विभाग निवडून त्यातून महसूल सेवा निवडा. पुढे उत्पन्नाचा दाखला किंवा मिळकतीचे प्रमाणपत्र हा पर्याय निवडा. पुढे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून त्याप्रमाणे सर्व कागदपत्रे तयार ठेवा कारण ती वेबसाईटवर अपलोड करावे लागते.

वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, किती वर्षांपासून त्या पत्त्यावर राहतो ती माहिती सादर करावी. अपलोड करायची असलेली कागदपत्रे 75 केबी ते 500 केबीच्या दरम्यान असावीत. सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमचा फोटो आणि सही देखील अपलोड करा. यानंतर अर्ज सबमीट कराव आणि अर्जाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा. शुल्क भरल्यानंतर मिळणारी पावती सेव्ह करुन ठेवा.

15 दिवसानंतर लॉगीन करुन प्रमाणपत्र मिळाले का पाहा?

आपले सरकारवरुन अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत आपल्याला मिळकतीचे प्रमाणपत्र मिळेल. काही अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास 15 दिवसानंतर आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉगीन करुन अपील अर्ज सादर करु शकता.

हेही वाचा

Back to top button