जास्त काही करु नकोस.. एवढंच करुन बघ दोस्ता!
जास्त काही करु नकोस दोस्ता. राज्यातलं एक घर शोध. कोणतं घर, ते समजेलच तुला.
अंधारल्या स्वयंपाकघरात भाकऱ्या थापणारी म्हातारी माय दिसेल. कपाळावरचा घाम पदराने टिपता टिपता चुलीतल्या निखाऱ्यावर ती फुंकर मारत असेल. तिच्यासमोर जाऊन बस. खोली शेणाणे सारवलेली असेल. लाजू नको. निवांत बस. ती हसून म्हणेल, ‘भूक लागली का रं लेकरा?’ होय म्हण.
तवलीभर दुध ताटात ओतून बाजरीच्या दोन गरम खरपूस भाकऱ्या तुझ्या हातात देईल, अन् म्हणेल पोटभर खा. काही न बोलता गुमान खा. जेवता जेवता अवतीभोवती बघ. पडकी भिंत, गळका पत्रा, पिवळा बल, कोपऱ्यातली मोडकी सायकल, दारातल्या शेळ्या, कोपऱ्यातल्या चपला आणि भिंतीवर लावलेला लेकराचा फोटो बघ. तीही तुझ्याकडं बघेल. काही बोलू नकोस. डोळ्यातलं पाणी आडवत तीही शांत बसेल. नाहीच आवरलं, तर पटकन पदरात तोंड खुुपसून भावना मोकळ्या करेल. तु मात्र खात रहा. तिला रडूदे.
काही क्षणात ती थांबेल आणि म्हणेल, ‘अजून देऊ का?’ तु नकार दे. बळजबरी ती अर्धी भाकरी तुझ्या ताटात वाढेल. वरुन ग्लासभर दूध देईल आणि आईच्या हुकमाने खा म्हणेल. तु स्मित कर आणि खायला सुरवात कर. पुन्हा फोटोकडं बघ. आता ती माऊली भेगाळल्या डोळ्यानं तुझ्याकडं पाहत असेल. तिचे डोळे सुकलेले असतील. त्या कोरड्या डोळ्यात पाहत फक्त म्हण,
‘काकू तुमच्या पोराचं मरणं वाया नाय जाणार. नक्की मिळेल आरक्षण.’
आता तिच्याकडं निरखून बघ.
डोळ्यात सात समुद्राचं पाणी आलेलं असेल आणि त्याच वेळी तिच्या ओठावर शारदाचं चांदणं पसरलं असेल.
बस एवढचं करुन बघ दोस्ता. तुला वेदना समजतील.