माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा हात सोडला..; भाजपात सामील होणार? Ashok Chavan Resign
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची वाट धरली आहे. चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
या संदर्भात अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटलंय की, “मी दिनांक 12/02/2024 च्या मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे.”
पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं पत्र अशोक चव्हाणांनी ज्या लेटरहेडवर लिहिलंय, त्या लेटरहेडवरील ‘विधानसभा सदस्य’ या शब्दांपुढे ‘माजी’ असे पेनाने लिहिलं होतं. त्यानंतर ट्वीट करून त्यांनी स्पष्टही केलं की, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा चालू आहे. अशातच चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे चव्हाण आता भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याविषयी बोलताना राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसचे अनेक लोकनेते आगामी काळात भाजपात येतील.
फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, “काँग्रेसमधील अनेक चांगले नेते, हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे. त्यातून जनतेशी घट्ट जोडलेल्या नेत्यांची सध्या घुसमट होतेय. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपात प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मी आता एवढंच म्हणेन, आगे आगे देखिये होता है क्या…”
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी आमदारकीचाही (विधानसभा सदस्यत्वाचा) राजीनामा दिला आहे. तशी पत्रं त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली आहेत. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पटोले हे काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.