बारामती रेशीम कोष मार्केट बनले देशातील पहिले ‘ई-नाम’ कोष कमोडिटी मार्केट! E-NAM
बारामती | ‘‘बारामती रेशीम कोष मार्केट हे ई-नाम प्रणालीद्वारे 100 टक्के ऑनलाइन काम करणारे देशातील पहिले मार्केट आहे. ‘ई-नाम’मध्ये कोष कमोडिटीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये देशातील खरेदीदार सहभागी होत आहेत. त्यामुळे रेशीम कोषास चांगला दर मिळत आहे,’’ असे मत पणन मंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक महेंद्र लोखंडे यांनी व्यक्त केले. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ व रेशीम कार्यालयातर्फे सुरू केलेल्या रेशीम कोष मार्केटमध्ये ‘ई-नाम’ पद्धतीने कोष लिलावाच्या वर्षपूर्तीनिमित्त रेशीम शेतकरी व रिलर्स मेळावा नुकताच घेण्यात आला.
समितीचे सभापती सुनील पवार अध्यक्षस्थानी होते. या वेळी प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहाय्यक संचालक डॉ. कविता देशपांडे, पणन मंडळाचे एजीएम महेंद्र लोखंडे, रेशीम तांत्रिक सेवा केंद्राचे शास्त्रज्ञ शिवकुमार हुक्केरी, शास्त्रज्ञ हुमायून शरीफ, बाजार समितीचे उपसभापती नीलेश लडकत, सदस्य बापूराव कोकरे, विनायक गावडे, सतीश जगताप, दयाराम महाडीक, सांगलीचे जिल्हा रेशीम अधिकारी बापूराव कुलकर्णी, मुरलीधर कुट्टे, समितीचे सचिव अरविंद जगताप आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘बारामती रेशीम कोष मार्केटमध्ये चांगली विक्री व्यवस्था आहे. अन्य राज्यांतील बाजारांप्रमाणे दर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या समितीतर्फे शेतकरी व रिलर्स यांना परवाना देण्यात येईल. त्यामुळे सर्व रिलर्सनी परवाने घेऊन ई-नाम प्रणालीत नोंदणी करवा. ई-नाम पद्धती असल्याने देशातील रिलर्स व खरेदीदार यामध्ये भाग घेऊ शकतात. त्यामुळे रिलर्सना एकाच ठिकाणी कोष मिळतील.
शेतकऱ्यांना ही जादा रिलर्स सहभागी झाल्यास स्पर्धा होऊन कोषास चांगला दर मिळेल. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊन त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेल. शेतकऱ्यांनी आपले कोष ग्रेडिंग करून आणावेत. त्यामुळे प्रतवारीनुसार कोषास योग्य दर मिळेल.’’
शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना रेशीम कोष विक्री करू नयेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामध्ये फसवणूक होऊ शकते. तसेच भविष्यातील धोके विचारात घेऊन रेशीम कोष उत्पादकांनी कोष बारामती मार्केटमध्येच विक्रीस आणावा. खरेदीदार व रिलर्सनी परस्पर व थेट कोष खरेदी करू नयेत, असे आवाहन या वेळी करण्यात आले.