कोल्हापूर : कबनूर येथे पूर्ववैमनस्यातून महाविद्यालयीन युवकाचा खून | Kolhapur Crime News
कोल्हापूर | कबनूर येथे पूर्ववैमनस्यातून चार ते पाच जणांनी चाकू आणि गुप्तीने भोसकून महाविद्यालयीन युवक प्रसाद संजय डिंगणे (वय 17, रा. जवाहरनगर) या युवकाचा निर्घृण खून केला. यावेळी झालेल्या हल्ल्यात त्याचा मित्र सौरभ शहाजी पाटील (22, रा. जवाहर नगर) हा गंभीर जखमी झाला आहे. कबनूर हायस्कूल परिसरात रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तिघा हल्लेखोरांना रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.
जवाहरनगर येथे राहणारा प्रसाद संजय डेंगणे हा कबनूर हायस्कूल येथे स्नेहसंमेलन पाहण्यासाठी गेला होता. त्यास जवाहरनगर भागातील चार ते पाच हल्लेखोरांनी शाळेबाहेर बोलावून मारहाण करण्यास सुरू केली. याची माहिती कळताच प्रसादचे दोघे मित्र याठिकाणी धावून आले. यावेळी चार ते पाच हल्लेखोरांनी चाकूने प्रसादवर वार केले. यात बरगडीत गुप्तीसारख्या हत्याराचा घाव वर्मी बसल्याने प्रसाद जागीच कोसळला, तर सौरभ शहाजी पाटील याच्या हातावर, कमरेवर तसेच पाठीवरही चाकूने वार करण्यात आले आहेत. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना घडताच शाळेतील स्नेहसंमेलन तातडीने थांबविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी तसेच रुग्णालयात गर्दी झाली होती. जखमी सौरभ पाटील याच्यावर सांगली येथील शासकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत.
पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी रुग्णालयात भेट दिली. संशयित अल्पवयीन असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. प्रसाद हा अकरावी इयत्तेत शिकत होता तो एकूलता होता. शिवाजीनगर पोलिसांत रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
दोन दिवसांत दोन खून
पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून जावयाने साथीदारांसह सासर्याचा दगड व फरशीने ठेचून खून केला. जावेद बाबू लाटकर (वय 42, रा. आझाद गल्ली, इचलकरंजी) असे त्यांचे नाव आहे. ही घटना तीन बत्ती चौक परिसरात बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संशयित सिकंदर मोहम्मद अली शेख याच्या दुचाकीची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली. तो पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.
शेख याचे चिकन विक्रीचे दुकान असून, यापूर्वी तलवार घेऊन भागात दहशत माजवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.