इथे कोणत्याच जात, धर्म, पंथ, वंश, वयातील स्त्री सुरक्षित नाही!
सकाळपासून प्रचंड त्रास होतो आहे. माझं नॉर्थ ईस्टमधील लोकांशी अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे. २००५ सालात मी सहा महिन्यांसाठी आसाम, मेघालय, नागालँड या राज्यात राहिले होते. तेव्हाही ते धगधगत होतं, मात्र त्याची तीव्रता वेगळी होती. एके दिवशी मी नागालँडला एका संस्थेच्या सहकाऱ्यांसह निघाले होते. मध्येच स्थानिक बंड करणाऱ्या एका गटाने गाडी थांबवली. हातात बंदूक, तोंड झाकलेले. मला वाटले, आता संपले आयुष्य. पण संस्थेला ओळखत असल्याने त्यांनी सोडून दिले.
त्या क्षणी जी हृदयात कालवाकालव झाली त्याच्या कितीतरी अधिक पटीने आज मणिपूरमधील स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराबद्दल वाचून त्रास होतो आहे. त्या स्त्रियांच्या ठिकाणी मीच आहे असे हजारदा वाटले. या स्त्रिया किती यातनेतून गेल्या असतील. त्यांनी जमावातील पुरुषांनी बलात्कार करू नये, शरीराला स्पर्श करू नये, मारू नये म्हणून हात जोडून किती विनवण्या केल्या असतील… पाया पडल्या असतील.. भाऊ, दादा, बाबा म्हणाल्या असतील. पण या पुरुषांमधील माणूस मेल्याने “कपडे काढा नाही तर मारून टाकू” अशी धमकी देत त्यांनी करायचे ते केले. विरोध केला म्हणून एकीच्या भावालाही या जमावाने मारून टाकल्याचे वाचले.
या मुली आयुष्यात पुन्हा कुठल्याही पुरुषाकडे विश्वासाने, प्रेमाने पाहू शकतील?
या धक्क्यातून त्या सावरून सामान्य आनंदी आयुष्य जगू शकतील?
त्यांना रोज रात्री झोप लागेल की भयाने दचकून उठतील?
स्वतःच्या शरीराकडे पाहिल्यावर यातना, ओरखडे आठवणार नाहीत त्यांना?
भारतीय म्हणून त्यांना देशाचा अभिमान वाटेल?
या स्त्रिया मुलींना किंवा पुरुषाला जन्म देतील?
४ मे रोजी मैतेई समूहातील पुरुषांनी कुकी या आदिवासी समूहातील स्त्रियांची नग्न धिंड काढणाऱ्या, त्यांच्या योनीत हात घालणाऱ्या, स्तनांना हात लावणाऱ्या, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या हिंस्र पुरुषांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. ते मानवी समूहात राहण्याच्या लायकीचे नाहीत. गाव जाळून झाल्यावर याच गटाने एका गावातील एक प्रौढ आणि एका किशोरवयीन मुलाला मारल्याचेही वाचले. हे लवकर थांबायला हवे.
महिलांवर बलात्कार करणाऱ्या एकाच्या मुलाखतीत महिलांसोबत सेक्स करण्यासाठी त्यांची सहमती घ्यायची असते हे माहित नसल्याचे त्याने सांगितले होते. खरंय त्याचं… बाईवर जबरदस्ती करण्याची आपल्याकडे परंपराच आहे, मग ती घरातील स्त्री असो की मणिपूरमधील. स्वतःची इच्छा, बदला घेण्यासाठी स्त्रीच्या शरीरावर वर्षानुवर्षे अत्याचार होत आला आहे. जो बलात्कार बेडरूममध्ये होतो, तोच आता रस्त्यावर आला आहे. पुरुष,नाती बदलतात, बलात्कार तोच राहतो. बाई फक्त योनी आहे, त्यापलीकडे काही नाही ही समाजाची सार्वजनिक, स्विकारार्ह मानसिकता आहे.
आपले प्रशासन तर मणिपूर भारतात नसल्यासारखे त्याकडे दूर्लक्ष करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नॉर्थ इस्ट जळते आहे, मात्र प्रशासन काहीच पाऊले उचलत नाही लोकांना ते आपले वाटत नाही. अशाने तिथल्या लोकांना भारत आपला देश आहे असे वाटणार आहे काय? काहीच उपाय न करणे हे जे घडतं आहे त्याला साथ देण्यासारखे असते. काहीही केले तरी चालते, आपले कुणी वाकडे करू शकणार नाही असा ठाम विश्वास आलेला समाज फार वेगाने अराजकतेकडे वाटचाल करत आहे याचे लक्षण आहे.
महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा बिल्कीस बानोपासून सुरू झालेला गंभीर प्रवास ज्योती सिंग, असिफा, साक्षी, विनेश आणि आता मणिपूर…
या सगळ्यातून एकच दिसत आहे भारतात एकही स्त्री सुरक्षित, सुखरूप राहू शकत नाही. ज्यांना वाटते की, विशिष्ट जाती धर्माचे पुरुष माजलेत, त्यांची आब्रू घालवायची असेल, तर त्यांच्या बायकांवर, मुलींवर बलात्कार केले की ते हरतील आणि आपला पुरुषार्थ जिंकेल. इतर जातीय, धर्मातील, वंशातील स्त्रियांवर होणारे बलात्कार पाहून लाज न वाटणाऱ्या किंवा “बरे झाले त्या बायांची जिरवली” असे निर्लज्ज समर्थन करणाऱ्या पुरुषांना त्यांच्या जाती, धर्म, वंशात किंवा स्वतः च्या घरातल्या बायांवर बलात्कार झाले तरी त्यांना काही वाटेल ही आशा आता उरली नाही.
आपल्याकडे काही बायका,मुली आहेत ज्यांना वाटते विशिष्ट जात धर्माच्या बायांवर बलात्कार, लैंगिक अत्याचार झाले तर ठीकच आहे. या भोळ्या भाबड्या(?) बायांना हे ठाऊक नाही की हे नराधम या बायका, मुलींवरसुद्धा बलात्कार करायला मागे पुढे पाहणार नाहीत. त्यांच्यासाठी योनी फक्त योनी आहे, त्यात जात, धर्म, वंश, रंग, वय.. कशाचाही फरक पडत नाही.
काही वर्षांनी स्त्रियांनी पुरुषहीन आयुष्य जगणं सुरू केलं तर ते असमर्थनीय असणार नाही.
असा हिंस्त्र समाज नको असेल तर बिल्कीस, साक्षी, कटुआ, मणिपूर याबद्दल बोलायला हवे… न्याय मागायला हवा. निषेध करायला हवा. विरोध करण्यासाठी स्वतःचेच घर जळायला हवे असे नाही.
आज स्त्रियांनीच नाही तर माणूस म्हणवणाऱ्या प्रत्येक पुरुषाने अशा क्रूर पुरुषांचा, वृत्तीचा निषेध करायलाच हवा आणि असे होणार नाही, करणार नाही याची ग्वाही स्त्रियांना द्यायला हवी.
©लक्ष्मी यादव