राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशनात निलंबनाची कारवाई; वाचा नेमकं काय घडलं?

नागपूर | नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सध्या चांगलच गाजत असल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, अपशब्द वापरल्या प्रकरणी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.

अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांनी निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला. यावेळी विरोधापक्षनेते अजित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याच्या संतापात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांना (Maharashtra Assembly Winter Session) असंसदीय शब्द वापरल्यानंतर मोठा गदारोळ झाला.

जयंत पाटील यांनी अधिवेशनात बोलू न दिल्याने विधानसभा अध्यक्षांना निर्लज्ज असा अंससदीय शब्द वापरला. त्यामुळे सत्ताधारी बाकांवरून जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी सूरू झाली. या गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज 15 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.

सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या विधानाबद्दल प्रस्ताव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी ठराव बहुमताने मंजूर केला. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. उद्यापासून अधिवेशन संपेपर्यंत त्यांना अधिवेशनामध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची मागणी केली. ही मागणी अध्यक्षांनी फेटाळून लावली. विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्हाला संधी दिली होती, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. त्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले.

सत्ताधारी बाकावरून 14 जणांना बोलण्याची संधी दिली आणि विरोधी बाकावरून एका सदस्याला बोलण्याची संधी दिली पाहिजे अशी मागणी करण्यात येत होती. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी संताप व्यक्त करत तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका, असे म्हटले.

जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी करत सभागृहात गोंधळ घातला.

अजित पवार यांच्याकडून दिलगिरी

दरम्यान, या निलंबनाच्या कारवाईसंदर्भात विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त करत निलंबनाची कारवाई मागे घेण्याची विनंती केली.