Dhananjay Munde यांचं पद जाणार? बीड प्रकरणी दिल्ली हाय अलर्ट मोडवर
संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिल्ली हाय अलर्ट मोडवर आली आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचे पद जाणार असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुंबई | संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर राजकीय दबाव वाढला आहे. वाल्मिक कराड यांना अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात असून, त्यांच्या सोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
दिल्लीमध्येही लक्ष:
बीड जिल्ह्यातील या प्रकरणाने राष्ट्रीय स्तरावरही खळबळ उडवली आहे. दिल्लीमध्ये भाजप नेते यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्याचेही समोर आले आहे. तपासात ठोस पुरावे हाती लागल्यास धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे.
विरोधकांचा दबाव:
राज्यात विरोधकांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी थेट मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही मुंडेंवर गंभीर आरोप करत त्यांना मंत्रिपद सोडावे लागेल, असे ठामपणे म्हटले आहे.
पद वाचणार की जाणार?
सध्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र होत असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मुंडे यांचे पद वाचणार की जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात ६ आरोपी अटकेत
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी संतोष देशमुख हत्याप्रकरण पहिली मोठी अग्निपरीक्षा आहे. आरोपी वाल्मिक कराडला आत्मसमर्पण करण्यासाठी २० दिवस का लागले, हत्याप्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार का आहे, असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत.
सारंगी महाजन यांचे मुंडेंवर गंभीर आरोप
“परळीत प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली जमीन त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या नावे करण्यात आली होती. या जमिनीची किंमत साडेतीन कोटी रुपये इतकी होती. मात्र, धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी माझ्याकडून ही जमीन जबरदस्तीने २१ लाख रुपयांना विकत घेतली”, असा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. इतकंच नाही तर, मुंडे कुटुंबियांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यानेच सर्व व्यवहारांमध्ये भूमिका बजावली होती, असा आरोपही सारंगी महाजन यांनी केला आहे.