Govt. SchemeNews

‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे कधी मिळणार? अजित पवारांनी सांगितली तारीख, म्हणाले.. “दोन महिन्यांचे 3 हजार एकत्र..! Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Majhi Ladki Bahin Yojana) अर्ज करण्यासाठी आणि त्याचा लाभ मिळवण्यासाठी महिलांची लगबग सूरू आहे. अनेक महिला सेतू केंद्रावर जाऊन या योजनेसाठी अर्ज करताना दिसत आहेत. आता या योजनेबद्दल महत्वाची अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच केलेल्या भाषणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार याची तारीख जाहीर केली आहे.

अजित पवारांनी नुकतंच अहमदनगरमधील पारनेर या ठिकाणी एक सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबद्दलची बरीचशी माहिती उपस्थितांना दिली. तसेच या योजनेचे पैसे कधीपासून मिळणार आणि किती मिळणार याबद्दलही सांगितले.

“सर्व उत्तर त्या फॉर्मवर देण्यात आली आहेत”

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आवश्य भरा. तो फॉर्म भरण्याचे काम शासन करत आहे. प्रशासनातील सहकारी, अंगणवाडीत काम करणाऱ्या माझ्या महिला भगिनी हे काम करत आहेत. तो फॉर्म नीट-नेटका भरा. ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत असतील तरी काळजी करु नका. नवीन योजना आहे, थोड्या अडचणी येऊ शकतात. 1 जुलैपासून ही योजना सुरु केली आहे. जर तुम्ही फॉर्म भरला नाही, तर पैसे कसे मिळतील, असे प्रश्नही उपस्थितीत होतात. पण याबद्दलची सर्व उत्तर त्या फॉर्मवर देण्यात आली आहे, असे अजित पवारांनी म्हटले.

दोन महिन्याचे पैसे एकत्र देणार

अजित पवार म्हणाले, तुमच्या अकाऊंटला आम्ही दर महिना 1500 रुपये देणार आहोत. सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे आम्ही एकत्र देणार आहोत. ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यात या योजनेचा फॉर्म भरला आणि तुम्ही यात लाभार्थी म्हणून बसत असाल तरी तुम्हाला जुलैपासूनचे पैसे दिले जातील. त्यामुळे काळजी करु नका.

ज्या गरीब माय माऊली आहे, त्यांच्या काही गरजा भागवण्यसाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेवरुन माझ्यावर विरोधकांनी टीका केली. सर्व घटकातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जर एखादी परराज्यातील महिला महाराष्ट्राची सून म्हणून आली तरी आम्ही तिलाही या योजनेचा लाभ देणार आहोत, असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने पैसे देण्यास सुरुवात

येत्या 19 तारखेला ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आता एका बहिणीने मला राखी बांधली. आमचा प्रयत्न आहे की रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमच्या माय-माऊलींच्या अकाऊंटला 3 हजार रुपये जुलै-ऑगस्टचे द्यायचे आहेत. इतकी चांगली योजना असूनही विरोधक माझ्यावर टीका करतात. ज्या गरीब महिला आहेत, त्यांच्यासाठी ही योजना सुरु केली आहे, असेही अजित पवार म्हणाले.

Back to top button