मुंबई | राज्यभरात मुसळधार पावसाचा तडाखा सुरू असून कोकण आणि घाटमाथा परिसरात (Weather Update) पुढचे पाच दिवस पाऊस आणखी जोरदार कोसळणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाद्वारे देण्यात आली आहे. या काळात राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, असेही आयएमडीने (IMD Rain Alert) म्हटले आहे.
Weather Update – राज्यातील मागच्या चोवीस तासातील पावसाची आकडेवारी पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारी वरून दिसून येते. गगनबावड्यात 210 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याबरोबरच रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे 156 मिमी, पेण 140 मिमी, रोहा 130 मिमी, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे 153 मिमी, पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे 111 मिमी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे 145 मिमी तर वैभववाडी येथे 119 मिमी आणि रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुढील 3 ते 4 तासात जोरदार पावसाची शक्यता
मच्छिमाराना समुद्रात न जाण्याचा इशारा
सध्या वारे 40-55 किमी वेगाने वाहत आहेत. वादळीवाऱ्यासोबत 65-75 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे मच्छिमारानी 27 जुलैपर्यंत काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. याकाळात मच्छिमारांना सुरक्षित राहण्याचा आणि या प्रदेशांमध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात तुफानवृष्टी सुरू असल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असून पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.