हवामान विभागाचा रत्नागिरीला \’रेड\’ तर ‘या’ 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात कसा असेल पाऊस? जाणून घ्या.. | Weather Update
मुंबई | हवामान विभागाने आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करत अतिवृष्टीचा (Weather Update) इशारा दिला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खेड, चिपळूण, दोपाली यासह कोकणातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून रस्त्याची नदी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हवामान खात्याने रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून राज्यातील 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामध्ये पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, हिंगोली, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, धुळे याठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्यासह खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.
रविवारी (ता. 14) सकाळपर्यंतच्या 24 तासात कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाची अतिवृष्टी झाली आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर असलेल्या ताम्हिणी येथे तब्बल 310 मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर बऱ्याच ठिकाणी 200 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
उत्तर गुजरात आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे सर्वदूर जोरदार पावसाची स्थिती पहायला मिळत आहे.
- मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) : – रत्नागिरी
- जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वर्धा.
- जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी, धाराशिव, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली.
- विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, जालना, बीड, नागपूर, भंडारा, गोंदिया.