News

Walmik Karad ने शेतकऱ्यांना तब्बल 11 कोटी 20 लाखांना गंडवलं; ‘हे’ आहे प्रकरण

संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अलीकडेच, त्याच्या मुलाने त्याच्या मॅनेजरला धमकी दिल्याचे समोर आले आहे. त्यातच आता वाल्मिक कराडचा आणखी एक मोठा कारनामा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

ऊसतोड यंत्र घोटाळ्याचा आरोप
वाल्मिक कराडने सोलापूरसह राज्यातील 140 ऊसतोड यंत्रमालकांची तब्बल 11 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ऊसतोड यंत्रमालक दिलीप नागणे यांनी केला आहे. शासकीय अनुदानातून ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी 36 लाख रुपये मिळवून देतो, असे सांगून वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांकडून पैसे उकळले असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

बीडची दहशत ऊसपट्ट्यात
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासादरम्यान, बीडमधील मुकादम आणि त्यांच्या फसवणुकीचे कनेक्शन उघड झाले आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी या प्रकरणावर कठोर भूमिका घेत, मुकादमांविरोधात फौजदारी स्वरूपात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

ऊस पट्ट्यात बीडची दहशत गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. बीडमधील ऊस तोड मुकादमांनी कोल्हापूरमधील शेतकऱ्यांची दोन वर्षांत तब्बल ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना बीड मधील मुकादमांनी असा गंडा घातला असून ऊस तोड मजूरांसाठी पैशांची उचल करून प्रत्यक्षात मजूर न पाठवून फसवणुक केली आहे. त्यामुळे ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आकडा आणखी कित्येक कोटींनी वाढण्याची शक्यता आहे.

एसआयटीची कारवाई आणि मोक्का लावला
दरम्यान, आज एसआयटीने सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) लावला आहे. मात्र, सध्या वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात अटकेत असल्याने त्याच्यावर मोक्का लावण्यात आलेला नाही.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रगती
मागील काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी जोर धरत होती. अखेर एसआयटीने ही मागणी मान्य करत आरोपींविरोधात कडक कारवाई केली आहे. या निर्णयामुळे संबंधित आरोपींना जामीन मिळणे आता कठीण होईल, असे मानले जात आहे.

Back to top button