वाल्मिक कराडच्या मुलाचेही कारनामे उघड; मॅनेजरच्या पत्नीने केले गंभीर आरोप; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून… नेमकं काय घडलं? वाचा… Walmik Karad
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येप्रकरणातील मास्टरमाईंड म्हणून आरोप असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) पोलीस कोठडीत असताना आता त्याच्या मुलाचा अनोखा प्रताप समोर आला आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने (Sushil Karad) मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुशील कराडने त्याच्या मॅनेजरकडून जबरदस्ती बल्कर ट्रक, कार, प्लॉट आणि सोने ताब्यात घेतल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल केली आहे. सुशील कराडने मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवून लूट केल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे. येत्या १३ जानेवारीला याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
पीडित महिलेचे आरोप
तक्रारदार महिलेच्या मते, सुशील कराड आणि त्याच्या दोन साथीदारांनी (अनिल मुंडे आणि गोपीन गुंजेवार) तिच्या पतीवर सतत दबाव टाकला. पीडित महिलेचा पती सुशील कराडसाठी काम करीत होता. मात्र, सुशील त्याला सतत “तू इतके पैसे कसे कमावलेस?” अशी विचारणा करत मारहाण करीत असे.
यानतंर या तिघांनी त्याचे राहतं घर आणि जागा अनिल मुंडे याच्या नावावर करुन घेतली. त्याच्या दोन ब्लकर ट्रक आणि दोन गाड्या यांच्या चाव्या तसेच त्याची कागदपत्र त्याच्याकडे ठेवली. इतकंच नव्हे तर त्याने पीडित महिलेच्या पतीचे अडीच तोळे सोने परळीतील ज्वेलर्सला विकून त्याच्याकडून पैसे घेतले. ते पैसे त्याने स्वत:कडे ठेवले. परत त्याला मारहाण करत तू इतके पैसे कसे कमवले अशी विचारणा केली.
महिलेच्या मुलांवरही अत्याचार
यानंतर त्या पीडित महिलेने वाल्मिक कराड यांचीही भेट घेतली. पण सततची मारहाण आणि रिव्हॉलव्हरच्या धाकाला कंटाळून भीतीपोटी पीडित महिला, तिचा पती आणि तिची दोन मुले सोलापुरात आले. यादरम्यान परळीत पीडित महिलेच्या मुलीला सुशील कराडने मारहाण केली होती. तसेच पीडित महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याचीही तक्रार या महिलेने केली आहे.
पोलिसांनी दखलच घेतली नाही
पिडीत महिलेने सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर सीपी ऑफिस, आणि बीड एसपी ऑफिस येथे RTED ने तक्रार केली होती. त्यासोबत गाड्यांचे सध्याचे लोकेशन कुठे आहे, हे देखील पाठवले. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्याने तक्रारीची साधी दखलही घेतली नाही, असा दावा महिलेने केला आहे. शेवटी तिने सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली.
सुनावणी १३ जानेवारीला
तक्रारीवर आधारित न्यायालयाने आरोपीचे म्हणणे मागवले होते. मात्र, काल होणारी सुनावणी आरोपीच्या वकिलाच्या गैरहजेरीमुळे पुढे ढकलली गेली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी येत्या १३ जानेवारीला होणार आहे.
न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा
सुशील कराड, अनिल मुंडे, आणि गोपीन गुंजेवार यांच्या कारवायांमुळे पीडित कुटुंब मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करत आहे. न्यायालयीन सुनावणीत सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा तक्रारदारांकडून व्यक्त होत आहे.