वाल्मिक कराड सह मुंडेंचाही पाय खोलात; धनंजय मुंडेंसोबतचा ‘तो’ व्हिडीओ समोर | Walmik Karad

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू असून, हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा मानला जातो. त्यामुळे मुंडेंवर सातत्याने टीका केली जात आहे. सध्या वाल्मिक कराड पोलीस कोठडीत असून चौकशी दरम्यान धक्कादायक तपशील समोर येत आहेत.

धनंजय मुंडे आणि कराड यांचा जुना व्हिडीओ समोर
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा सह्याद्री गेस्ट हाऊसमधील एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये १४४ ऊसतोड यंत्रमालक धनंजय मुंडे व कराड यांची भेट घेताना दिसत आहेत. ऊसतोड यंत्रमालकांच्या अनुदान प्रकरणात कराडने त्यांची फसवणूक केल्याचे आरोप आहेत. (Video)

कराडवर ऊसतोड शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा आरोप
वाल्मिक कराडवर ऊसतोड यंत्रमालकांची ११ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कराडने शासकीय अनुदानातून यंत्र खरेदीसाठी ३६ लाख रुपये मिळवून देण्याचे अमिष दाखवले आणि १४० शेतकऱ्यांकडून पैसे उकळले. अनुदानासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना धमकावण्याचा आणि मारहाण करण्याचाही आरोप कराडवर करण्यात आला आहे.

सरपंच हत्या प्रकरणाचा ऊसपट्ट्यातील घोटाळ्याशी संबंध?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीचे संबंध पश्चिम महाराष्ट्रातील ऊसपट्यातील शेतकऱ्यांना फसवण्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बीड जिल्ह्यातील ऊसतोड मुकादमांनी अनेक शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेत मुकादमांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

कोल्हापूर मधील शेतकऱ्यांची 50 कोटींची फसवणूक
बीडमधील मुकादमांनी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना फसवले आहे. दोन वर्षांत कोल्हापूरमधील शेतकऱ्यांची तब्बल ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मजुरांसाठी पैसे उचलूनही प्रत्यक्षात मजूर न पाठवल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.