Walmik Karad: वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी
खंडणी प्रकरणात अटक झालेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या जामीन अर्जावर केज न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. त्यांच्या वतीने वकील अशोक कवडे यांनी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. गुन्ह्यात पुरावा नसल्याचे सांगत, कराड यांना अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा वकिलांनी केला आहे.
वकील अशोक कवडे यांची भूमिका
“कराड यांच्यावर खोट्या आरोपांमुळे अटक करण्यात आली आहे. खंडणी मागितल्याचे कोणतेही ठोस पुरावे तपास यंत्रणेकडे नाहीत. प्रकरणाची उशिरा नोंद झाल्यामुळेही हे प्रकरण संशयास्पद ठरते,” असे कवडे म्हणाले. खंडणी मागितली आणि खंडणी दिली, खंडणी मागितली किंवा दिली यातील कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. आमची बाजू बघून न्यायालयाने आम्हाला जामीन द्यावा ही मागणी आम्ही उद्या न्यायालयात करणार आहोत. आमच्या पक्षकाराचा न्यायालयावर विश्वास आहे”, असं वकील अशोक कवडे म्हणाले.
कराड यांचे अमेरिकेशी संबंध नाहीत
“वाल्मिक कराड यांच्यावर असलेल्या गुन्ह्याच्या ज्या बातम्या प्रकाशित झाल्या त्यानंतर पक्षकाराने संबंधित तपास अधिकारी यांच्याकडे यादी दिली आहे. यात त्यांच्यावर 14 गुन्हे दाखल होते. यापैकी 11 ते 12 गुन्ह्यातून ते दोष मुक्त झाले आहेत. बाकीचे गुन्हे राजकीय आंदोलनातील संदर्भातले आहेत. कराड यांचे अमेरिकेशी संबंध आहेत का नाही? याबाबत न्यायालयासमोर कुठलाही भाग आलेला नाही. तपास अधिकारी योग्य ते खुलासा करू शकतील”, असंही वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे असून, राज्य सरकारने एसआयटी आणि न्यायालयीन समितीची स्थापना केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण, खंडणी प्रकरण आणि या प्रकरणांशी संबंधित विविध प्रकरणावर सध्या तपास सुरु आहे. तपासातून काय-काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.