बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील मोठ्या प्रमाणात सुरू असून, मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होत आहे.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे. दरम्यान या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून आरोप असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) पुण्यात सीआयडीला शरण आला असून सध्या तो सीआयडीच्या कोठडीमध्ये आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली असून यामुळे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ऊसतोड यंत्रमालकांच्या अनुदान प्रकरणात वाल्मिकने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केल्याची बातमी यापूर्वीच समोर आली होती. यातच आता हार्वेस्टर शेतकऱ्यांकडून वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यामुळे एक मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे. अमर पालकर या शेतकऱ्याने केलेल्या दाव्यानुसार, हार्वेस्टर मशिनच्या शासकीय अनुदानासाठी वाल्मिक कराडला प्रत्येक शेतकऱ्याने ८ लाख रुपये दिले आहेत.
मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मंत्री धनंजय मुंडेंना माहिती
अमर पालकर या शेतकऱ्याने केलेल्या दाव्यानुसार, १४ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात कृषीमंत्री धनंजय मुंडेंना भेटून ८ लाख रुपये देत असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यावेळी मुंडेंनी “लवकरच अनुदान मंजूर करून देऊ” असेही सांगितल्याचे या शेतकऱ्यांने म्हणटले आहे.
हार्वेस्टर मालकांचे आरोप
राज्यातील १४१ हार्वेस्टर मालकांनी प्रती हार्वेस्टर ८ लाख रुपये दिल्याचे सांगितले आहे. हे पैसे परळी आणि पनवेल येथे वाल्मिक कराड, नामदेव सानप आणि जितु पालवे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. विशेषतः पनवेलमधील देवीस रेसिडेन्सी येथील १७ नंबर रूममध्ये पैसे देण्यात आले होते.
वाल्मिक कराडकडून मारहाण आणि धमक्या
पैसे देऊनही अनुदान न मिळाल्याने विचारणा करायला गेलेल्या शेतकऱ्यांना कराड यांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच, या प्रकरणाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही देण्यात आली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आत्मदहनाचा इशारा
पैसे परत न मिळाल्यास मंत्रालयात सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.