सायकलवरचा \’विशू\’ ते केबीनमधले \’अधिकारी विश्वजीत..\’
सन २००८-०९ चा काळ असेल शिवाजी विद्यापीठ हे खुलं अंगण होत. नऊ-दहा वाजेपर्यंत माणसांची गर्दी असायची. मुलींचे हॉस्टेल तर साडेआठ वाजेपर्यंत खुल असायचं. त्यावेळी मुख्य इमारती समोरील बाग ही सर्वांसाठी खुली असायची त्यामुळे साडेआठ वाजेपर्यंत काही विद्यार्थी विद्यार्थिनींची गर्दी छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात असायची.
मी काम करत असलेल्या गांधी अध्ययन केंद्राच्या बाजूच्या पत्रकारिता विभागातील विश्वजीत भोसले व अर्चना माने यांच्याशी माझी चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे विद्यापीठ परिसरात या दोघांची मला वारंवार भेट व्हायची. रात्रीचे साडेआठ वाजले की पावसाळा असो अथवा उन्हाळा, शेवटला जाणारे हे दोघे मला नेहमी रस्त्यात दिसायचेत. विश्वजीत त्यावेळी सायकल घेऊन फिरायचा. अर्चना ज्यावेळी माहिती अधिकारी म्हणून शासनात हजर झाली. त्यावेळी तिने पहिल्याच पगारात विश्वजीतला नवीन मोटरसायकल प्रेझेंट दिली होती. विश्वजीतचा सायकलवरचा प्रवास संपून मोटरसायकलीवर आला होता.
त्या \’सायकलीवरचा विश्वजीत.. ते नुकताच कोल्हापूरच्या महावितरण विभागात जनसंपर्क अधिकारी म्हणून मुंबई येथून बदली होऊन हजर झालेले विश्वजीत\’ यामध्ये याप्रवासात गर्व, अधिकारी पदाची झुल या शब्दांचा प्रवेश झाला नाही किंबहुना आजही तो आमच्यासाठी विश्वजीत म्हणूनच आहे. जो विश्वजीत उर्फ विशू शिवाजी विद्यापीठांमध्ये अनुभवला होता, तोच विश्वजीत काल-परवा केबीनमध्ये सुद्धा अनुभवला. त्यामुळे कोल्हापूर महावितरण विभागात जनसंपर्क अधिकारी म्हणून नुकताच रुजू झालेबद्दल या दिलदार मित्राबद्दल मैत्री दिनाच्या निमित्ताने त्याच्याविषयी भरभरून लिहावं वाटलं…
रात्रीचे साडे आठ वाजून गेले होते. विश्वजीत एका हातात सायकल धरून दुसऱ्या बाजूला अर्चना डोक्यावर छत्री धरून असे दोघे चालले होते. विश्वजीतच्या मोबाईलवरती गाणं लागलं होतं, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या….. चालत जात असताना दूर शिक्षण विभागाच्या बाजूला हे दोघे दिसले. गाणे ऐकले आणि ते गाणे ब्लूटूथद्वारे माझ्या मोबाईलला घेतले. अशा या समविचारातून आमची मैत्री घट्ट होत गेली.
विश्वजीतची रुम सायबर चौकातील अंबाई डिफेन्स परिसरात होती. मग कधी सायकल लागली किंवा एखादं पुस्तक वाचायला हवं असलं की मी त्याच्या रूमवर जायचो. विश्वजीतचा वाचन आवाका मोठा होता. दैनिक लोकसत्तातील संपादकीय पान तर आवर्जून वाचणे आणि प्रत्येक पानाची जपणूक करून ठेवणे हा विश्वजीतचा आवडता छंद. याचे मला नेहमी अप्रूप वाटायचे आणि त्यांने निवडलेले लेख शक्य होईल तेवढे मी नजरे करून घालायचो. रूम स्वच्छ ठेवणे, प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे ठेवणे, दैनिक सुद्धा तारखेप्रमाणे एका रेषेमध्ये ठेवणे हे विश्वजीतचे वैशिष्ट्य. या स्वभावामुळे विश्वजीत शाहू स्मारकला भेटायला येणार म्हटले की माझ्या बाजूचा सर्व काही व्यवस्थित करून ठेवायचो.
एकूणच मैत्रीचा धागा इतका घट्ट होत गेला की, विश्वजीतचा विशु कधी झाला कळालं नाही. आणि आता तर अधिकारी पदावर गेल्यामुळे बोलण्यात सर आले, साहेब आले. असे असले तरी आज लिहीत असताना सर-साहेब लिहू लागलो तर मैत्रीतले ते निखळ क्षण लिहू शकणार नाही त्यामुळे मित्र विशू हा नजरेसमोर ठेवूनच लिहिण्याचा प्रयत्न करतोय.
अर्चना शासकीय सेवेत होतीच पण स्पष्टोक्तपणा आणि बंडखोरी स्वभावामुळे खोट्या मुखवट्याच्या व्यवस्थेशी ती एकरूप होऊ शकली नाही. त्यामुळे ढोंगी व्यवस्थेला जय महाराष्ट्र करून तिने अखेर स्वेच्छानिवृत्ती घेऊन एक आनंदी जीवन जगण्याचा निर्णय घेतला. दरम्यान विशू स्पर्धा परीक्षेतून महावितरण विभागात जनसंपर्क अधिकारी म्हणून रुजू झाला. दोघांचा प्रवास एका यशाकडे सुरू झाला.
विशु सायकलवर असताना सुद्धा मित्रांसाठी सदैव तत्पर असणारा, अनेकांना मदत करणारा त्याचा हा स्वभाव अधिकारी झाल्यानंतर सुद्धा बदलला नाही. शिक्षणाबद्दल प्रचंड आस्था, प्रत्येकाने शिकत राहिले पाहिजे, शिक्षण थांबवू नये, कितीही अडचणी आल्या तरी शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही तळमळ त्याच्या स्वभावात कायम राहिली. यासाठी प्रसंगी एखाद्याला अडचण असेल तर त्याची शैक्षणिक फी स्वतः भरण्यासाठी सुध्दा विशू आजही तत्पर असतो. माझ्या माहितीप्रमाणे किमान दहा ते वीस लोकांची फी त्यांनी आज पावतो भरली असावी.
नोकरी मुंबईत पत्नी अर्चना कोल्हापुरात; पण सुट्टीला आला की सगळ्या मित्रांना एकत्र करायचे त्यांच्या आवडीनिवडीनुसार प्रत्येकाला खाऊ घालायचे, शक्य होईल तेवढे फिरवायचे, प्रत्येकाच्या अडीअडचणी जाणून घ्यायच्या त्यामध्ये काही मदत करता आली तर ती निरपेक्ष भावनेतून करायची असा त्याचा स्वभाव आजही आहे. मित्रांसाठी वेळ आणि पैसा खर्च करत असताना कधीही संकोच बाळगला नाही. याला अर्चना सुद्धा आजही साथ देते.
आता काही शेती खरेदी करून शिवाजी विद्यापीठ कंपाऊंड लगतच सुंदर असा फ्लॅट खरेदी करून अर्चना व विशू हे आनंदी जीवन जगत असताना मित्रांना कधीच लांब केलेले नाही. अर्चना-विशुच घर हे मित्रांसाठी सदैव खुलं असत. त्यामुळे मला मित्र म्हणून माझी सर्व सुख दुःख रीत करण्याचं ठिकाण म्हणून विशू कडे पाहता येईल. आता मित्र म्हणजे तो गुणदोषासह स्वीकारलेला असतो. विशुचा स्वभाव म्हणजे तोंडावर स्पष्टपणे बोलणे प्रसंगी ते शब्द काही क्षण मनाला लागले तर चालतील पण वास्तववादी बोलणे, अधिकाराचे बोलणे हे आपल्याला कधी-कधी खटकणारे वाटत असतं पण ह्या मैत्रीतच खरी आपुलकी असते, सच्चेपणा असतो. जे मित्र आपल्याला रागाने स्पष्टपणे बोलत असतात, भांडत असतात तेच मित्र सदैव आपल्या सोबत टिकतात; नाहीतर खोटे कौतुक करून आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जात असतात. पण विशू मात्र आम्हाला नेहमी एका सत्याच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी एक सच्चा मित्र म्हणून लाभला हे आमचं भाग्य.
कोल्हापुरातील मित्रांची काळजी घेणे ही तर एक बाजू झाली आणि दुसरी बाजू म्हणजे मुंबईत नोकरी करत असताना मुंबईतला फ्लॅट असेल किंवा स्वतःची उपलब्धता ही मित्रांसाठी २४/७ आजपर्यंत होती. त्यामुळे कोल्हापुरातील अनेक मित्र मुंबईत स्थिरस्थावर होऊ शकले. ते केवळ विशुमुळेच. आपल्या सुखदुःखात विशेषता सुखात मित्रांचा सुद्धा वाटा असावा या वृत्तीने विशु आजही वावरत असतो.
कोल्हापूरच्या महावितरण विभागात जनसंपर्क अधिकारी म्हणून रुजू होऊन आठवडा झाला पण मला जायला जमले नव्हते. पण एक मित्र भेटला आणि त्याचे काम निघाले हा दोन्हींचा संयोग साधावा म्हणून विशुचा सत्कार करण्यासाठी त्याला सोबत घेऊन गेलो. जाताना एक छोटीशी शाल आणि गुच्छ घेतला होता. पण गेल्या गेल्या हे कशाला आणला, कशाला पैसे खर्च करता हे शब्द ऐकायला लागले. औचित्याचा भाग म्हणून आम्ही सत्कार केला आणि नेहमीप्रमाणे काय चाललंय ही विचारपूस सुरू झाली.
सोबतच्या मित्राची ओळख करून दिली. त्या मित्राचा पूर्ण इतिहास समजून घेतला. त्याला अनेक गोष्टी सांगितल्या त्याचे शिक्षण अर्धवट थांबले हे समजल्यानंतर त्याला शिक्षणाचे महत्त्व ठासून सांगितले. काही अडचण आली तर आमच्याकडे ये हे सुद्धा सांगितले आणि शेवटपर्यंत त्याला शिक्षणाचे महत्व सांगितले. कष्ट घेण्याविषयी सांगितले.
हे सर्व ऐकून तो मित्र प्रभावीत झाला आणि येताना विशुला नमस्कार करायला झुकला, त्यावेळी विशूने त्याला थांबवलं आणि म्हणाला, आपण कोणाचेही पाय धरायचे नाहीत, केवळ आपल्या आई-वडिलांचे पाय धरायचे. एखाद्या व्यक्तीला आपण वाकून नमस्कार करत असतो याचा अर्थ त्या व्यक्तीपुढे शरण जात असतो आणि विनाकारण त्याला श्रेष्ठत्व बहाल करत असतो त्यामुळे ही कृती परत करत जाऊ नको.\’
हा प्रसंग डोळ्यासमोर पाहिला \’सायकलवरचा विशू ते केबिन मधले जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले\’ यामध्ये केवळ पद आले, पैसा आला, प्रतिष्ठा आली पण आपल्या मित्राला गर्व आणि अहंकाराचा स्पर्श झाला नाही याचा मनस्वी आनंद झाला आणि अशा या मित्राला मैत्री दिनाच्या निमित्ताने या शब्दरूपी शुभेच्छा देत आमच्या मैत्रीला स्वल्पविराम देऊन लेखणीला पुर्णविराम देतो…!
- युवराज स. कदम
संस्थापक अध्यक्ष,
वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, कोल्हापूर
दि. ३-८-२०२