विशाळगडची दंगल पूर्वनियोजित? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, शिंदे गटाचे खासदार माने यांचा सरकारला घरचा आहेर | Vishalgarh Riot Pre-planned
कोल्हापूर | विशाळगडची दंगल पूर्वनियोजित होती काय? तसेच प्रशासनाने अतिक्रमणाचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत दिशाभूल केल्याचा आरोप करत, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली. ते कोल्हापूर येथे आज (गुरूवार 18 जुलै) पत्रकार परिषदेत बोलत होते. दंगल घडवणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
विशाळगडावर १५८ अतिक्रमण आहेत. त्यापैकी सहा जणच न्यायालयात गेले आहेत. तरीही प्रशासन अतिक्रमणाचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत दिशाभूल करीत राहिले. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वच गडावरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी असणार आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी दिली. वारंवार दंगली घडवून कोल्हापूरला, शासनाला आणि संभाजीराजे छत्रपती यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी बोलताना माने म्हणाले, संभाजीराजे छत्रपती विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी पाठपुरावा करीत होते. मात्र प्रशासनाने त्याकडे दूर्लक्ष केले. संभाजीराजेंची यापूर्वीची सर्व आंदोलने, मोर्चे संयमी होते. विशाळगडावरील अतिक्रम काढावे, या मागणीसासाठी संभाजीराजे जाण्यापूर्वीच दंगल झाली.
दंगलीचे समर्थन करणार नाही. मात्र प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि दुर्लक्षपणा यामुळे हा चुकीचा प्रकार घडला. दंगली घडवून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कोणी सक्रिय आहेत, का याचाही शोध घेण्याची गरज असल्याचे माने यांनी सांगितले.
गडकोट किल्ल्यावरील अतिक्रमण हटवले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. गड-कोट किल्ले अतिक्रमण मुक्त केले पाहिजेत. यासाठी शासन कडक भूमिका घेत आहे. मात्र विशाळगडावरील दंगल ही प्रशासनाच्या चुकीमुळे झालीय. ही दंगल पूर्वनियोजित होती का? याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे असे सांगत माने यांनी या दंगलग्रस्त गावाला आपण लवकरच भेट देणार असल्याचे यावेळी सांगितले.