News

विशाळगड हिसांचार प्रकरणातील दंगेखोरांना अटक झालीच पाहीजे, \’छत्रपती शिवाजी महाराज की जय\’ म्हणत कोल्हापुरात एमआयएमची निदर्शने | Vishalgad

कोल्हापूर | विशाळगडच्या (Vishalgad) पायथ्याशी असलेल्या गजापूरवर हल्ला केलेल्या दंगेखोरांना अटक झालीच पाहीजे, अशी मागणी करत ऑल इंडिया मज्लिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) च्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात निदर्शने करण्यात आली.

इन्साफ दो इन्साफ दो गजापूर को इन्साफ दो, भारतीय संविधानाचा विजय असो, महिलांवर हल्ला करणाऱ्यांना अटक झालीच पाहीजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजर्षी शाहू महाराज की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देत एमआयएमने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.

यावेळी, जिल्हाध्यक्ष इम्रान सनदी, इलियास कुन्नुरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना याबाबतचे निवेदन दिले. विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अन्य चुकीच्या गाेष्टींना आमचा अजिबात पाठिंबा नाही. मात्र येथील दर्गाह हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून देशात प्रसिद्ध आहे. गडावरून परतताना गजापुरातील हल्ल्यामुळे नागरिकांचे न भरून येणारे नुकसान झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

त्यामुळे हल्लेखाेरांवर कडक कारवाई करा, कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करा, हल्ल्यात बाधीत झालेली धार्मिक स्थळे व घरांसाठी शासनाकडून नुकसान भरपाई द्या, हल्ल्यातील जखमी व्यक्तींना प्रत्येकी 5 लाखांची मदत सरकारतर्फे द्या, मुस्लीम समाजासाठी संरक्षण कायदे विशेष अधिवेशन बोलावून तात्काळ संमत करा, वरील घटनेची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत करा, अशा मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

यावेळी मोहसीन हकीम, सिराज नदाफ, सलमान नाईकवाडे, इरफान बिजली, जुबेर पठाण, फिरोज डांगे यांच्यासह मुस्लीम नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button