News

विशाळगडची दंगल ही विधानसभेपूर्वीची ट्रायल, ठाकरे गटाचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

कोल्हापूर | विशाळगड (Vishalgad) येथील दंगल पूर्वनियोजित असून ही विधानसभेआधीची ट्रायल आहे. या हिंसाचाराच्या घटनेमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे, असा आरोप करत गुरुवारी (ता. 18 जुलै) शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापूर पोलिस महानिरीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

जिल्हा पोलिस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करावी, अशी मागणी यावेळी ठाकरे गटाने केली. यावेळी भाजपच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून राज्य अस्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही शिवसेना ठाकरे गटाने केला.

विशाळगड येथील दंगलीस राज्य सरकार जबाबदार आहे. पावसाळ्यात अतिक्रमणाची मोहीम कशी काय सुरू होऊ शकते? पोलिसांनी चार दिवसानंतर सायबर कलम लावले. मागील चार दिवस पोलिस काय करत होते? असे प्रश्न उपस्थित करत या दंगलीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असून विशाळगडावरील हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा दावा करण्यात आला. तसेच या हिंसाचाराला जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांचीही साथ असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांनी केला.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार म्हणाले, \”विशाळगडची दंगल ही विधानसभा निवडणुकीपूर्वीची ट्रायल आहे. विशाळगडची दंगल ही राज्य सरकार जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांचा पूर्व नियोजित कट आहे. अतिक्रमण काढलेच पाहिजे, पण हे दंगलीपूर्वी काढणे गरजेचे होते. भाजपला महाराष्ट्र अस्वस्थ आणि नेहमी धगधगता ठेवायचा आहे. त्यांना दोन समाजात तेढ निर्माण करायचे आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी केली पाहिजे.\” अशी मागणी यावेळी संजय पवार यांनी केली.

Back to top button