News

शिवभक्तांच्या आग्रहाखातर विशाळगड मुक्ती मोहीमेची तारीख बदलली: छत्रपती संभाजीराजे यांची माहिती

कोल्हापूर | शिवभक्तांच्या आग्रहाखातर विशाळगड मुक्ती मोहीमेची तारीख बदलण्यात आली आहे. याबाबतची माहिती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. आता दि. 13 ऐवजी 14 जुलै रोजी विशाळगड मुक्ती मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीराजे गेल्या दीड वर्षांपासून किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर लढा देत आहेत. मात्र गेल्या दीड वर्षांत प्रशासनाकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांनी दि. 7 जुलै रोजी कोल्हापूर येथे विशाळगड अतिक्रमण मुक्तीबाबत पुढील दिशा ठरविण्यासंदर्भात शिवभक्तांची बैठक घेतली होती.

छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाचा वेढा भेदून 13 जुलै 1660 रोजी विशाळगडावर पोहचले होते. त्यामुळे या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून 13 जुलै 2024 रोजी हजारो शिवभक्तांसह किल्ले विशाळगडावर जाऊन अतिक्रमण हटविण्याचा निर्धार करण्यात आला होता.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी असंख्य शिवभक्तांनी प्रतिसाद दिला असून शनिवार ऐवजी रविवारी ही मोहीम आयोजित करावी अशी मागणी राज्यभरातील अनेक शिवभक्तांकडून करण्यात आली. शिवभक्तांच्या मागणीचा विचार करून छत्रपती संभाजीराजे यांनी 13 जुलै ऐवजी रविवार, दि. 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता विशाळगड येथे येण्याचे आवाहन केले आहे.

Back to top button