News

विशाळगडावरील हिसांचाराबाबत प्रकाश आंबेडकरांचा संभाजी भिडेंवर गंभीर आरोप, म्हणाले… Vishalgad Encroachment

कोल्हापूर | गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यभर विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दरम्यान विशाळगड अतिक्रमण मुक्ती मोहिमे दरम्यान तेथे मोठी दगडफेक झाली. घरांची तोडफोड, जाळपोळ तसेच हिंसाचार झाल्याचा प्रकारही समोर आला. याबाबत आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी थेट संभाजी भिडेंवर (Sambhaji Bhide) गंभीर आरोप केले आहेत.

संभाजी भिडेंच्या धारकांनी विशालगडावर (Vishalgad Encroachment) धुडगूस घातल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, विशाळगडावर आधीपासून लोकांनी अतिक्रमण केलं आहे. पण अतिक्रमण काढण्याचे काही नियम आहेत. तुम्हाला ते लगेच हटवता येत नाही, तसा प्रस्ताव दिल्यास ते शक्य आहे.

माजी खासदार संभाजीराजे यांच्या विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनादरम्यान जो प्रकार घडला त्यामध्ये संभाजी भिडे यांचं सैन्य असल्याची आमच्याकडे माहिती आहे. त्यांच्या धारकांनीच तिथे धुडगूस घातला. जाणून-बुजून तेथील लोकांना मारहाण करण्यात आली आणि दुकानं तोडण्यात आली.

संभाजी भिडेंच्या धारकांनी तिथे तंग वातावरण तयार करण्याचे काम केलं. सरकारने याची चौकशी करून दंगलखोर कोण होते याचा शोध घ्यावा आणि दुसऱ्या बाजूला यावर तोडगा निघू शकतो का? याबाबत मार्ग शोधावा अशी शासनाला आमची विनंती असल्याचेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

Back to top button