विशाळगड प्रकरणी 500 लोकांवर गुन्हे दाखल, आत्तापर्यंत 21 जण ताब्यात, संभाजी राजेंवरही गुन्हा दाखल | Vishalgad Encroachment Issue
कोल्हापूर | विशाळगड अतिक्रमण मुक्ती मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. यावेळी प्रक्षुब्ध जमावाने दगडफेक, जाळपोळ केली. यामध्ये अनेक घरे, वाहने जळून खाक झाली. काहीजण जखमी झाले. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. याप्रकरणी आता शाहूवाडी पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले असून आत्तापर्यंत 21 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये कोल्हापूरसह इचलकरंजीतील काहींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
याप्रकरणी पुण्याचे रवींद्र पडवळ, बंडा साळोखे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला गालबोट लावल्या प्रकरणी कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून, आता त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये 500 हून अधिक लोकांच्याविरोधात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 132, 189 ( 2), 190, 191 (2) , 191 (3),323, 298, 299 (49), 189 (5 ) यासह पोलिस अधिनियम 37 (1) उल्लघन 135 या नुसार गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी तपास सुरू असून विशाळगडावरील व आसपासच्या परिसरातील CCTV आणि इतर व्हिडियो रेकॉर्डिंग पाहून कोल्हापूर पोलीस गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहेत.
किल्ले विशाळगड येथे अतिक्रमणे वाढली आहेत. ती हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी गेल्या रविवारी महाआरती केली होती. तर रविवारी 14 जुलै रोजी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गेली दीड वर्ष शासन, प्रशासन याबाबत निष्क्रिय असल्याचा आरोप करून विशाळगड येथे शिवप्रेमींना येण्याचे आवाहन केले होते. स्वतः संभाजीराजे देखील या मोहिमेत सहभागी झाले होते.
मात्र, यावेळी मोहिमेत सहभागी झालेल्या काही तरूणांच्या गटानी गजापूर हद्दीतील अनेक घरातील प्रापंचिक साहित्य रस्त्यावर पेकून त्याची मोडतोड केली, विशाळगडाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेली प्रार्थना स्थळे, दुकाने, चहाच्या टपऱ्या, वाहने यांची देखील यावेळी तोडफोड करण्यात आली.
रात्री एक वाजता मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात, कायदा, सुव्यवस्थेची घेतली माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात येऊन मध्यरात्री विशाळगड प्रकरणी माहिती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री एक वाजता शिंदे कोल्हापुरात आले होते. त्यांनी आपल्या या दौऱ्यात कोल्हापूरच्या आयजींकडून विशाळगडाबाबत तसेच येथील परिस्थितीबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी कोणतीही अनूचित घटना घडू नये यासाठी आवश्यक तो बंदोबस्त करावा, असे सांगितले आहे. येथील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही आयजींसोबत चर्चा केली. एकनाथ शिंदे हे पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. मात्र त्यांनी अचानक आपला मोर्चा वळवून रात्री एक वाजता थेट कोल्हापूरची वाट धरली आणि विशाळगडाच्या अतिक्रमाणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर माहिती जाणून घेत चर्चा केली.
विशाळगडावर तोडफोड, दगडफेकीच्या घटना
विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी घेऊन 14 जुलै रोजी काही शिवभक्त विशाळगडावर पोहचले होते. यावेळी गडावर तोडफोडीच्या, जाळपोळीच्या आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. या घटनांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. दुसरीकडे विशाळगडावरील स्थानिकांनी मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा असूनही या घटना घडल्या आहेत.