News

Vinesh Phogat: विनेश फोगाटच्या रौप्य पदकाची आशा अजूनही कायम, CAS चा निर्णय बाकी

ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरल्यानंतर हताश झालेल्या भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) तडकाफडकी कुस्तीला निरोप दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबतची माहिती दिली. विनेशने निवृत्तीची घोषणा केली असली तरी आज तिच्या रौप्य पदकाबाबतही सुनावणी होणार आहे. त्यामुळे भारताची रौप्य पदकाची आशा अजूनही कायम आहे. याप्रकरणी CAS (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) आज आपला निकाल देणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशच्या रौप्यपदकाची आशा अजूनही कायम आहे. तिला रौप्य पदक मिळणार की नाही याबाबत आज निर्णय होणार आहे. अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटने CAS कडे अपील केले आहे. तिला अपात्र ठरवण्यात आल्याविरोधात तिने अपील केले आहे.

रौप्य पदकासाठी विनेशची CAS कडे अपील

विनेशने अपील करताना म्हटले की तिला रौप्य पदक देण्यात यावे. त्याशिवाय तिने अंतिम सामना खेळण्याची परवानगी देखील मागितली होती. मात्र, ती मागणी फेटाळण्यात आली. आज विनेशच्या रौप्य पदकाच्या मागणीवर निर्णय येणार आहे. CAS ने अंतिम निर्णय देण्यासाठी गुरुवारी सकाळपर्यंत वेळ मागितला आहे. क्रीडा व्यवहार न्यायालय सकाळी साडेअकराच्या सुमारास निकाल देणार आहे. सीएएसने विनेशच्या बाजूने निकाल दिल्यास आयओसीला संयुक्तपणे विनेशला रौप्य पदक द्यावे लागेल. म्हणजेच ५० किलो महिला कुस्तीच्या अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या कुस्तीपटूसोबत विनेशलाही संयुक्तपणे रौप्यपदक द्यावे लागेल.

विनेशला रौप्यपदक विजेत्याची सुविधा मिळणार, हरियाणा सरकारची घोषणा

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी जाहीर केले की, विनेश फोगाट जरी फायनल खेळू शकली नसली तरी तिला रौप्य पदक विजेत्याला बक्षीसासह सर्व सुविधा दिल्या जातील. मात्र या निर्णयाचे स्वागत होण्याऐवजी त्यांच्यावर टिकेचा भडीमार होताना दिसत आहे. अनेकांनी त्यांना ही नौटंकी करण्यापेक्षा ब्रिजभूषण सिंह विरोधात न्यान मिळवून द्या, तसेच ती सुवर्णपदकाची मानकरी होती मग रौप्यपदकाच्या सुविधा का असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

नायब सैनी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, \”आमची हरियाणाची धाडसी मुलगी विनेश फोगाटने जबरदस्त कामगिरी करत ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. काही कारणांमुळे ती ऑलिम्पिक फायनल खेळू शकली नसली तरी ती आपल्या सर्वांसाठी चॅम्पियन आहे. आमच्या सरकारने ठरवले आहे की विनेश फोगाटचे पदक विजेत्याप्रमाणे स्वागत आणि सत्कार करण्यात येईल. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्याला हरियाणा सरकार जे सर्व सन्मान, बक्षिसे आणि सुविधा देते ते विनेश फोगटला कृतज्ञतेने दिले जातील. आम्हाला तुझा अभिमान आहे विनेश!.\”

Back to top button