News

Maratha Reservation | “मराठा आरक्षण न मिळण्यास राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जबाबदार” – वड्डेटीवार

मुंबई | मराठा आरक्षण न मिळण्यास राज्य सरकार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली. तसंच अभ्यास न करता आश्वासन कसं दिलं? तसंच मनोज जरांगेंनी 40 दिवस विश्वास का ठेवला असा सवालही त्यांनी विचारला. 

मराठा आरक्षणप्रश्नी हस्तक्षेप करण्यास केंद्र सरकारने नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. याविषयी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, केंद्राचा हस्तक्षेप करण्यास नकार म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की, पूर्वी देखील राज्य सरकारने केंद्र सरकारसोबत चर्चा करुन निर्णय घेतला नाही. केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्यास नकार देणे म्हणजे आता आरक्षण देण्याची राज्या सरकारची जबाबदारी आहे. आश्वासन पूर्ण होण्याची वेळ निघून गेली म्हणून सरकारच्या पुढच्या निर्णयाकडे आमचं लक्ष आहे. 

मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट होत आहे

विजय वडेट्टीवार म्हणाले, सध्या राज्यातील सर्व परिस्थितीला हे राज्य सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत. सरकारची ऐपतच नाही तर खुर्चीवर बसून काय होणार आहे हे आता सिद्ध झाले आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची भेट घेतल्याची माहिती आहे.  मुदत संपण्याच्या आत प्रक्रिया का केली नाही. यामुळे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट होत चालला आहे.

फडणवीसांना परत येणार नाही याची खात्री पटली

फडणवीसांच्या डीलिट केलेल्या ट्विटवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले,  मी पुन्हा येणार असं ट्विट केले होते. कदाचित ते डिलीट करताना ‘मी पुन्हा येऊ शकत नाही’ हे पटल्याने त्यांनी डिलीट केले असेल. ज्यावेळी ते म्हणतात मी येईल त्यावेळी ते येत नाहीत. दोघेजण बाशिंग बांधून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत, कशाला उगीच नवरदेव बनून बसतात. राज्यात लवकरच सत्तांतर होईल. हे जे सरकार आहे केवळ अध्यक्षांच्या मर्जीवर सुरू आहे. काहीतरी शिजत आहे, पुढची तयारी करत असताना हा सहज निघालेला ट्वीट असे मी मानतो.  

Back to top button